लातूर : मद्यपि, व्यसनी माणूस स्वत:बरोबर समाजालाही बिघडवून टाकतो. त्यामुळे व्यसनी माणसांवर सामाजिक बहिष्कारच टाकला पाहिजे, असे मत संत प.पू. श्री १०८ प्रतिकसागर महाराज यांनी येथे रविवारी व्यक्त केले. श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व सकल जैन समाजाच्या वतीने सर्वधर्म सत्संग महोत्सव काँग्रेस भवन समोरील प्रांगणात सुरू आहे. या महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते प्रवचन देताना बोलत होते. मद्यपि, व्यसनी लोकांचा चांगलाच समाचार प्रतिकसागर महाराज यांनी घेतला. वादळ, भूकंप झाल्यानंतर शासन धावून जाते. परंतु, सध्या देशभरात मद्यपि, व्यसनी लोकांचे वादळ घोंघावत असताना सरकार याची चिंता करीत नाही. व्यसनाधिनतेमुळे समाज व देशाचे मोठे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी काही तरी उपाय करावे लागतील. खरे तर मद्यपि, व्यसनी लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकला तरच नुकसान टळणार आहे. प्रत्येक समाजामध्ये स्त्रीभ्रूणहत्या, हुंडापद्धती या अनिष्ट प्रथा रूढ झाल्या आहेत. मुलींनी हुंडा मागणाऱ्या व व्यसनी मुलांशी विवाह करणार नाही, अशी शपथ घेतली पाहिजे. स्त्रीभ्रूणहत्या करणे, गर्भपात करणे महापाप आहे, असेही प.पू. प्रतिकसागर महाराज म्हणाले. तरुण पिढीला दारू, गुटखा व इतर व्यसनात गुरफटण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे तरुण पिढी व्यसनात गुरफटत चालली आहे. समुपदेशन करून त्यांना या व्यसनाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी व्यापक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजीव बुबणे, उपाध्यक्ष प्रफुल्ल शहा, किशोर नाकील यांची उपस्थिती होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष मोईज शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मकरंद सावे, उस्मानाबाद जि.प. सदस्या कांचनमाला सांगवे, सोलापूर दिगंबर जैन युवक जनजागरण मंचचे अध्यक्ष निलेश शहा, महामंत्री नेमचंद लाड, सुरेश जैन, दिनेश गिल्डा आदींनी महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
व्यसनी लोकांवर सामाजिक बहिष्कार टाका
By admin | Updated: March 21, 2016 00:22 IST