गंगापूर : मीपणा सोडून पक्षहिताला प्राधान्य देत गटतट विसरून कार्यकर्ते व नेते एकत्र आले, तरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकता येतील, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संपर्क प्रमुख राजेश टोपे यांनी येथे केले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापुरात आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता आढावा बैठकीत मंत्री टोपे बोलत होते. ते म्हणाले की, गाव तिथं शाखा असल्यास पक्ष संघटन मजबूत होईल. त्यासाठी सर्वांनी तन, मन, धनाने व आपसातील मतभेद विसरून काम केले पाहिजे, पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची पक्ष दखल घेतोच. सर्वांनी एकत्र येऊन पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन टोपे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी आमदार अण्णासाहेब माने, शिवाजी बनकर, विश्वजित चव्हाण, खालेद नाहदी, विजय वरकड, फैसल चाऊस, ऋषिकेश पाटील, अहेमद पटेल, बदर जहुरी, सूर्यकांत गरड, मनोज वरकड, सचिन विधाटे, आदींची उपस्थिती होती.