हिंगोली : भाजपाच्या एका शाखेच्या पदाधिकाऱ्यावर पालकमंत्री दिलीप कांबळे घसरल्याने त्यावर काही जुनी मंडळी भलतीच नाराज झाली आहे. पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना फैलावर घेतल्यास पक्ष संघटन वाढायचे कसे? असा सवाल ही मंडळी खाजगीत करीत आहे.विश्रामगृहावर भाजपा कार्यकर्त्यांसोबत पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी बैठक घेतली. त्यात काही पदाधिकाऱ्यांनी समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. यात एका कार्यकर्त्याने चक्क आपण विकासकामांकडे लक्ष द्या, कामे होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी एकेरीवर येत त्या कार्यकर्त्याला धारेवरच धरले. हा प्रकार घडल्यानंतर शहरातील काही कार्यकर्त्यांनी शहर कार्यकारिणीतील एका पदाधिकाऱ्याच्या घरी एकत्र येत बैठक घेतली. तसेच यापुढे पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याबाबत चर्चा केली. मात्र वरिष्ठांच्या कानावर टाकून यावर निर्णय घेण्यात येईल, असे काहींनी सांगितले. त्यानंतर हे प्रकरण तेवढ्यापुरते निवळले तरीही नाराजी मात्र कायम आहे.
पालकमंत्र्यांवर कार्यकर्ते नाराज
By admin | Updated: March 13, 2016 14:29 IST