औरंगाबाद : सुशिक्षित बेरोजगारांना गंडविणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय आहे. या टोळीने भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाचा लोगो वापरून महाराष्ट्र सुकन्या बालविकास योजनेत नोकरभरती करावयाची आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बेरोजगारांनी अशा जाहिरातीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या अशा प्रकारची जाहिरात शहरातील विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जात आहे. महाराष्ट्र सुकन्या बालविकास योजनेत २५ हजार ७०० रुपये एवढे वेतन देणार असल्याचे सांगितले जात आहे. या जाहिरातीनुसार शहरातील काही बेरोजगारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे, त्यांना बनावट नियुक्तीपत्रदेखील आलेले आहे. त्या नियुक्तीपत्रावर अशोक स्तंभाचा शिक्का वापरलेला आहे. ७ दिवसांच्या विशेष प्रशिक्षणाचा खर्च १५ हजार ५०० एवढा असून, तो धनाकर्षाद्वारे (डीडी) दोन दिवसांच्या आत बँकेत भरण्यास सांगितले आहे. जे उमेदवार दोन दिवसांत बँकेमध्ये पैसे भरणार नाहीत, त्यांची नावे यादीतून रद्द होणार असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद केलेले आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी अशा फसव्या जाहिरातीस बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बेरोजगारांना गंडविणारी टोळी सक्रिय
By admin | Updated: May 3, 2014 14:33 IST