औरंगाबाद : बंडखोरी आणि गटबाजीचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला असून बंडखोरी आणि गटबाजीमुळे सेनेचे ज्या वॉर्डात नुकसान झाले, तेथील सर्व पदाधिकारी बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. संघटनेत मोठे फेरबदल होणार विचाराधीन असल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सागितले. तर भाजपने १६ बंडखोरांवर कारवाई केली असून त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केल्याचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी सांगितले. भाजपने निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी देण्याचे आमिष दाखवून २ लाख सदस्य नोंदणीचा टप्पा कार्यकर्त्यांना उन्हा-तान्हात फि रून करून घेतला. परंतु मनपा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांच्या मतांची टक्केवारी पाहता त्यांना सदस्य नोंदणी एवढी मतेही मिळाली नसली तरी भाजपच्या १५ वरून २३ जागा निवडून आल्या. भाजपच्या ८ जागा वाढल्या आहेत. तर शिवसेनेच्या ३० वरून २८ जागा आल्या आहेत. मागच्या वेळच्या तुलनेत २ जागा सेनेच्या घटल्या आहेत.एमआयएमसारख्या विरोधी पक्षाशी सेनेचा मनपात सामना होणार आहे. अपक्षांना सोबत घेऊन भाजप मोठा भाऊ होतो की सेनेच्या शब्दावर विश्वास ठेवून सेनेकडे अपक्ष वळतात, याकडे आता लक्ष लागले आहे. पुंडलिकनगरमध्येदेखील अपक्ष उमेदवार लक्ष्मी लुटे यांनी सेनेच्या मीना गायके यांची पुरती दमछाक केली होती. संघटनेतील पदाधिकाऱ्यांनीच पुंडलिकनगरविरुद्ध हनुमाननगर, अशी लढत जन्माला घातली; परंतु ज्येष्ठ शिवसैनिक वत्सला राऊत, नीळकंठ मुसने, सूर्यकांत जायभाये, बापू कवळे यांनी परिश्रम घेऊन पुंडलिकनगरची जागा राखली.खुल्या प्रवर्गामुळे गायके यांची जागा पक्षाकडून भांडून घेण्यात आली होती; परंतु खुल्या प्रवर्गाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रचारात ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे अतिशय काठावर ती जागा निवडून आली. बाळकृष्णनगरमध्ये महापौर कला ओझा यांचे काम पदाधिकाऱ्यांनीच केले नाही. गजानननगर वॉर्डातदेखील पक्ष पदाधिकाऱ्यांनी आत्माराम पवार यांचे काम केले नाही. न्यायनगरमध्ये गजानन मनगटे यांनाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली नाही. विद्यानगरमधून राजू वैद्य यांना सेनेतील अंतर्गत गटबाजी आणि बंडखोरीमुळे शेवटपर्यंत झुंज द्यावी लागली. विश्रांतीनगरमध्ये प्रमोद राठोड यांनाही बंडखोरीचा सामना करावा लागला. केवळ पक्ष आणि काही मोजक्या निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांच्या जिवावर या जागा निवडून आल्या आहेत.१गुलमंडीतून सचिन खैरे पडले. बाळकृष्णनगरमधून महापौर कला ओझा यांना बंडखोरी आणि पक्षातील गद्दारांमुळे तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. मयूरनगरमधून वंदना इधाटे पडल्या. पहाडसिंगपुरा येथून अनिल भिंगारे पराभूत झाले. नंदनवन कॉलनीतून चारुलता मगरे तर जयसिंगपुऱ्यातून विलास संभाहारे, काचीवाड्यातून रंजना लिंगायत, नागेश्वरवाडीतून विनायक देशमुख, संजयनगरमधून सुवर्णा जेजूरकर हे गटबाजीमुळे पराभूत झाले. आविष्कार कॉलनीतून सोपान बांगर हे भाजपच्या बंडखोरीमुळे पडले. पदमपुऱ्यातील संजय बारवाल यांना बंडखोर गजानन बारवाल यांनी धूळ चारली. रमानगरची जागा भाजपमधील गटबाजीमुळे पडली. विष्णूनगरमध्येदेखील तेच झाले. ठाकरेनगरमध्ये सेनेच्या दीपाली गायकवाड यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या मीरा चव्हाण पडल्या. ३अंबिकानगरमध्ये सेनेच्या बंडखोरामुळे रामचंद्र ठुबे पडले. कामगार कॉलनीतून भाजपचे बळीराम कदम बंडखोरीमुळे पडले. भारतनगरमध्ये सेनेचे दिग्विजय शेरखाने बंडखोरीमुळे पडले. कांचनवाडीतून अनिता घोडेले, तर मयूरबन कॉलनीतून स्वाती जोशी या गटबाजी आणि बंडखोरीमुळे पराभूत झाल्या.
बंडखोरी, गटबाजी करणाऱ्यांवर होणार कारवाई
By admin | Updated: April 26, 2015 01:01 IST