शिराढोण : अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर शिराढोण पोलिसांनी कारवाई केली़ १० ब्रास वाळूसह दोन ट्रक असा २० लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला़ ही कारवाई सोमवारी सकाळी देवधानोरा (ताक़ळंब) येथे करण्यात आली असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिराढोण पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी सोमवारी सकाळी देवधानोरा परिसरात गस्तीवर होते़ यावेळी देवधानोरा येथील राममंदीराजवळ वाळूने भरलेली एक ट्रक, एक टिप्पर पोलिसांना दिसून आले़ पोलिसांनी चालकांकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली़ पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता सदरील वाळूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे समोर आले़ यावेळी पोलिसांनी १० ब्रास वाळूसह दोन्ही वाहने असा २० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ या प्रकरणी सपोनि संभाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बापू विश्वनाथ गुरव (रा़जुनोनी ता़उस्मानाबाद) व सद्दाम मगबूल शेख (रा़तोरंबा) या दोघाविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोना सुधीर तुगावकर, सुनिल इगवे हे करीत आहेत़ (वार्ताहर)
वाळूची तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई
By admin | Updated: May 27, 2015 00:39 IST