औरंगाबाद : प्राध्यापकांनी तास न घेणे ही चिंतेची बाब असून, यापुढे कोणत्या विभागात कोणत्या प्राध्यापकाने किती तास घेतले यासंबंधीची इत्थंभूत माहिती ठेवणारे सॉफ्टवेअर एका महिन्याच्या आत बसविले जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये प्राध्यापक तासच घेत नसल्याची परिस्थिती आहे. यासंदर्भात लोकमतने रविवारच्या अंकात ‘सर तास घेणार का? ’ हे वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे विद्यापीठात तास न घेणाऱ्या प्राध्यापकांमध्ये खळबळ माजली. तर तास घेणाऱ्या प्राध्यापकांनी या वृत्ताचे स्वागत केले. यासंदर्भात सोमवारी कुलगुरूंशी चर्चा केली असता त्यांनी तास न घेणाऱ्या प्राध्यापकांच्या वृत्तीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तास घेणे हे प्राध्यापकांचे नैतिक कर्तव्यच आहे. प्रत्येक प्राध्यापकाने आठ तास विभागात थांबलेच पाहिजे. त्याने तासाबरोबरच संशोधनात लक्ष दिले पाहिजे. काही शिक्षक चांगले आहेत. मात्र, सर्व विभागाची सर्व व्यवस्था विद्यार्थी केंद्रित झाली पाहिजे. कोणता प्राध्यापक किती तास घेतो यासंबंधीचे सॉफ्टवेअर विद्यापीठ खरेदी करणार असून, ते सर्व विभागात बसविले जाणार आहेत. सध्या विद्यापीठाच्या दोन विभागांत असे सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये विभागातील सर्व बाबींचे रेकॉर्ड होईल. तसेच प्राध्यापकाला तास घेतल्यानंतर विशिष्ट वेळेच्या आत त्याची माहिती त्या सॉफ्टवेअरमध्ये भरावी लागेल. अन्यथा त्याने तास घेतला नाही, असे गृहीत धरले जाईल. प्राध्यापकाने तास घेतला यासाठी विद्यार्थ्यांची सहमतीही या सॉफ्टवेअरमध्ये असणार आहे. सर्व विभागाचे नियंत्रण माझ्या केबिनमध्ये असेल. अनेक जण भाषण, दौरे याचे निमित्त करून तास घेत नसल्याचेही माझ्या लक्षात आले आहे.
तास न घेणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई
By admin | Updated: August 4, 2015 00:40 IST