लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानमंडळ समितीच्या दौऱ्यात जिल्ह्यातील रस्त्यांची अत्यंत दूरवस्था झाल्याची बाब अधोरेखित झाली असून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या करीता जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांना ‘अॅक्शनप्लॅन’ तयार करुन तो समितीसमोर सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती समितीचे प्रमुख आ.उदय सामंत यांनी गुरुवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.राज्य विधानमंडळ समिती ५ व ६ जुलै असे दोन दिवस परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी समितीने महसूल, गौण खनिज, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर विविध ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. त्यानंतर भेटी दिलेल्या ठिकाणांच्या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी गुरुवारी बैठक घेतली. या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना समितीचे प्रमुख आ.उदय सामंत म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील रस्त्यांची परिस्थिती भयावह आहे. १५ कि.मी.रस्त्यासाठी ४५ मिनिटे प्रवास करण्यासाठी लागतात. ही बाब समितीच्या दौऱ्यात प्रकर्षाने जाणवली. यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत ‘अॅक्शनप्लॅन’ तयार करण्याचे आदेश दिले असून हा अॅक्शनप्लॅन जिल्हाधिकारी समितीसमोर ठेवतील व तो मंजूर केला जाईल. गंगाखेड येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण झाले पाहिजे, या दृष्टीकोनातून योग्य ती मदत करण्याचे राज्य शासनाचे सूचविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय जिल्ह्यात रेल्वे ट्रॅकवर असलेल्या रस्त्यावर पूल नसल्याने रेल्वे आल्यानंतर फाटकावर बराचवेळ वाहनधारकांना ताटकळत उभे रहावे लागते. यासाठी विशेष बाब म्हणून प्रत्येक ठिकाणच्या रस्त्यावर रेल्वे पूल उभारावा, असे मुख्यमंत्र्यांकडे सूचविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथील पुलाचे काम १९९७ साली सुरु झाले. कंत्राटदारामुळेच या कामास वेळ लागला आहे. सदरील कंत्राटदार याबाबत जिल्हा न्यायालयात गेला आहे. त्या विरोधात शासन उच्च न्यायालयात जाईल व या पुलाचे काम पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. परभणीतील पाणीपुरवठा योजनेचीही चौकशी केली जाणार असून जिल्ह्याच्या विकासाचा निधी वाढविला जाईल. पोखर्णी येथील नृसिंह मंदिर, पाथरी येथील साईबाबांचे जन्मस्थळ, गंगाखेड येथील संत जनाबाई यांचे मंदिर, पालम तालुक्यातील जांबूळबेट ही धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळांचा दर्जा वाढवून त्यांचा विकास केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. समितीने दिलेल्या आदेशानुसार विकासकामांचा आढावा घेऊन याबाबतचा अहवाल दर महिन्याला सादर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचेही दौऱ्यात दिसून आल्याचे ते म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, आ.डॉ.राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव आदींची उपस्थिती होती.
रस्ते दुरुस्तीसाठी ‘अॅक्शन प्लॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 23:52 IST