औरंगाबाद : जिल्हा सध्या कोविड प्रतिबंधक नियमांच्या तिसऱ्या स्तरात असून, शासनाने लागू केलेले निर्बंध, अटी, शर्ती जिल्ह्यात यापुढेही लागू राहतील. दुपारी ४ वाजेनंतर सर्व व्यावसायिक आस्थापनांचे व्यवहार बंद राहतील, याबाबत संबंधित यंत्रणांनी नियंत्रण ठेवावे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी दिले.
कोरोना संसर्ग नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत मनपा, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
९ ते १५ जुलैमधील जिल्ह्यातील बाधित दर १.२४ टक्के असून त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. जिल्ह्याला आवश्यक प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, लसीकरण मोहिमेचे योग्य नियोजन ठेवावे. यामध्ये फ्रंटलाइन वर्कर या समूहातील सर्वांचे १०० टक्के लसीकरण होण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.