औरंगाबाद : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या मनपाने आठ दिवसांपूर्वीच कॅरिबॅगविक्रेते आणि उत्पादकांना कारवाईचा इशारा दिला होता. मनपाच्या इशाऱ्यानंतरही शहरात राजरोसपणे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगची विक्री सुरूच होती. बुधवारी सायंकाळी अचानक कारवाईचा बडगा उगारला. अंगुरीबाग परिसरात पाच व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. व्यापाऱ्यांकडून दीडशे किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. शासनाने काही वर्षांपूर्वी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगवर बंदी घातलेली आहे. शहरात सर्रासपणे कॅरिबॅगचा वापर सुरू आहे. शहरात चारशे ते पाचशे टन कचरा दररोज जमा होतो. यामध्ये सर्वात जास्त कॅरिबॅगच असतात. शासनाने बंदी घातलेली असतानाही कॅरिबॅग वापरणे सुरूच होते. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगमुळे पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होत आहे. शहरातील अनेक नाल्यांचा प्रवाह तुंबणे, ड्रेनेजलाईन चोकअप होण्याबरोबरच प्लास्टिकच्या कचऱ्याने मनपाच्या वाहनांवरही लोड वाढला होता. त्यामुळे नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्लास्टिक कचऱ्यासाठी वारंवार प्रशासनाला धारेवर धरले. मात्र, प्रशासन जागचे हलले नाही. सुनील केंद्रेकर यांनी मनपा आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर चार दिवसांत प्लास्टिक कचरा कमी करण्याचा निर्णय घेतला. प्लास्टिक बॅग विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगच्या स्टॉकची विल्हेवाट लावा अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. आज नगर सचिव दिलीप सूर्यवंशी यांना प्लास्टिक कॅरिबॅगची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सुनील केंद्रेकर यांनी दिले. सूर्यवंशी यांनी तातडीने पाच कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून मोतीकारंजा, पानदरिबा भागात धाव घेतली.
कॅरिबॅग विक्रेत्यांवर मनपाची कारवाई
By admin | Updated: December 17, 2015 00:11 IST