औरंगाबाद : शहरातील वाळूची चोरटी वाहतूक आणि विक्रीबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच झोपलेले महसूल प्रशासन जागे झाले. तहसीलच्या पथकांनी पोलिसांच्या मदतीने गुरुवारी पहाटेच वाळू माफियांविरुद्ध कारवाई सुरू केली. बीड बायपास, हर्सूल टी पॉइंट, सेंट्रल नाका आदी परिसरात दिवसभरात वाळूचे १८ ट्रक पकडण्यात आले. दंड भरल्यानंतर यातील १४ ट्रक सोडून देण्यात आले. उर्वरित ४ ट्रक जप्त करण्यात आले आहेत. दिवसभरात एकूण ५ लाख ५३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.जिल्ह्याच्या विविध भागांतून शहरात चोरट्या मार्गाने वाळू आणून विक्री केली जात आहे. महसूल आणि पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे काही वाळूमाफियांनी किराडपुऱ्यात शहराच्या इतरही भागांत वाळूचे बेकायदा साठे केले आहेत. यावर लोकमतने सविस्तर प्रकाश टाकल्यानंतर झोपलेले महसूल प्रशासन जागे झाले. तहसील कार्यालयाच्या पथकांनी आज सकाळी ६ वाजताच पोलिसांच्या मदतीने कारवाईला सुरुवात केली. सर्वांत आधी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ही पथके हर्सूल टी पॉइंट येथील एसबीओए शाळेसमोर धडकली. या ठिकाणी वाळूने भरलेले दोन हायवा ट्रक पकडण्यात आले. तेथून ही पथके जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाजवळ पोहोचली. तेथे पथकांना वाळूने भरलेला एक ट्रक आणि एक ट्रॅक्टर आढळले. चौकशी केली असता ही वाळू अवैध मार्गाने शहरात आणल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा लगेचच या ट्रॅक्टर आणि ट्रकचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर महसूलचे पथक एमजीएम ते आझाद चौक रस्त्यावर दाखल झाले. जिन्सी पोलीस ठाण्यातील पोलिसांचा फौजफाटा येथे आधीच हजर झाला होता. या ठिकाणी पडलेले वाळूसाठे आणि वाळूने भरलेले ट्रक- टेम्पोविरुद्ध कारवाईला सुरुवात करण्यात आली. वाळूचे चार साठे जप्त करून त्यांचा पंचनामा केल्यानंतर ही पथके बीड बायपास येथे पोहोचली. हॉटेल निशांत पार्कच्या जवळ वाळूने भरलेले अनेक ट्रक आढळून आले. पोलिसांच्या मदतीने महसूलच्या पथकांनी येथेही दंडात्मक कारवाई केली. या ठिकाणी एकूण १४ ट्रक आढळून आले. त्यानंतर पुन्हा ही पथके आझाद चौक भागात आली. सायंकाळपर्यंत विविध भागांत कारवाई सुरू होती. उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात, प्रभारी तहसीलदार डॉ. सारिका कदम आणि नायब तहसीलदार संजय गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी एच. पी. सोनवणे आणि एच. बी. तरटे यांच्या पथकांनी ही कारवाई केली. या पथकांमध्ये राजेंद्र बागडे, सुनील निकम, डी. सी. केदारे, शिवाजी भाग्यवंत, आर. डी. चव्हाण, डी. आर. जाधव, के. एस. सरकटे यांचा समावेश होता. तहसील कार्यालयातील बालाजी पालेकर, यशवंत राजे भोसले आणि आर. डी. डव्हळे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी सांगितले की, दिवसभरात एकूण १८ ट्रक पकडण्यात आले. त्यापैकी १४ ट्रकचालकांनी दंडाची रक्कम भरली. उर्वरित ४ ट्रक जप्त करून उपविभागीय कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. याशिवाय आझाद चौक भागात वाळूचे चार साठे जप्त करून पंचनामा करण्यात आला. आज दिवसभरातील कारवाईत एकूण ५ लाख ५३ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या ट्रकचालकांकडून दंड वसूल होणे बाकी आहे.
वाळू माफियांविरुद्ध कारवाई
By admin | Updated: November 7, 2014 00:52 IST