वाळूज महानगर : बजाजनगरात एका ६० वर्षीय वृद्धाचा खून करणारा आरोपी भारत गढवे याने तीन महिन्यांपूर्वीच वडगाव परिसरात एका सातवर्षीय चिमकुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्या कबुलीमुळे चिमुकलीवर अत्याचार करणारा गुन्हेगार समोर आल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बजाजनगरात शुक्रवारी (दि. २२) सकाळी सोमीनाथ राठोड (६०, रा. आडगाव-पळशी) यांचा अज्ञात आरोपीने डोक्यात दगड घालून खून केल्याचे समोर आले होते. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित आरोपी भारत गढवे (२२, रा. वडगाव) यास पकडले होते. पोलीस चौकशीत आरोपी भारतने खून केल्याची कबुली दिली.
अतिप्रसंगाचीही कबुली
पोलीस कोठडीत आरोपी भारत याने अन्य एका गुन्ह्याची कबुली दिली. तीन महिन्यांपूर्वी वडगाव परिसरातील एका सातवर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. मात्र चिमुकलीने आरडाओरडा केल्याने आरोपीने तिच्या ओठाचा चावा घेऊन तो पळून गेला. आरोपीने त्या चिमकुुलीच्या नातेवाइकाचा मोबाइल चोरून दोघांना विक्री केला आहे. पोलिसांनी चोरीचा मोबाइल खरेदी करणारे बाबासाहेब कोलते (छत्रपतीनगर, वडगाव) हा मोबाइल शॉपीचालक व त्याचा साथीदार शेख अन्सार (रा. राहुलनगर, औरंगाबाद) यांनाही सहआरोपी केले आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव, सतीश पंडित, पोलीस हेड कॉन्स्टेबल कय्युम पठाण, पोलीस नाइक प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल नवाब शेख, दीपक मतलबे, मनमोहन कोलिमी, विनोद परदेशी आदींनी ही कामगिरी पार पाडली.
-----------------------