लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशभरातील शैक्षणिक संस्थांचा दर्जा ठरविण्यासाठी राष्ट्रीय श्रेणी रूपरेखा संस्थांची (नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क) घोषणा केली होती. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राज्यात पहिला तर देशात दहावा क्रमांक पटकावला होता. मात्र, हा क्रमांक चुकीची माहिती देऊन मिळविला असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सत्य माहिती देऊन १०५ ते १५० यात क्रमांक पटकावला असल्याचेही डॉ. चोपडे यांनी सांगितले.विद्यापीठात पेट-३ परीक्षेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष कार्य अधिकारी डॉ. सतीश पाटील, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. दिलीप खैरनार उपस्थित होते. यावेळी संशोधनासंदर्भात माहिती देताना कुलगुरू डॉ. चोपडे यांनी विद्यापीठात होणारे संशोधन हे उच्च दर्जाचे आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘एनआयआरएफ’मध्ये औरंगाबादच्या विद्यापीठाला १०५ ते १५० यात स्थान मिळाले. असे स्थान मिळविणारे हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. यात महत्त्वाचे म्हणजे आपण खरी माहिती दिल्यामुळे मागे पडलो. पुणे विद्यापीठासारखी चुकीची माहिती दिली असती, तर आपले स्थान वरचे राहिले असते. पुणे विद्यापीठातूनच आलेलो असल्यामुळे तेथे काय चालते हे सर्व माहीत आहे. मात्र, आपणास गुणवत्तेच्या आधारावरच पुढे जायचे आहे. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले.
खोट्या माहितीमुळे ‘एनआयआरएफ’मध्ये पुणे विद्यापीठाचा क्रमांक राज्यात पहिला
By admin | Updated: June 6, 2017 00:54 IST