५ नोव्हेंबरपासून शहर बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली. बस सुरू झाल्यानंतर बस तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून महिला कंडक्टरांशी गैरवर्तन केले जात असल्याची तक्रार शिवसेनेच्या महिला आघाडीकडे करण्यात आली. मराठवाडा संपर्कप्रमुख आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या कला ओझा, सुनीता आऊलवार, सुनीता देव, अंजली माडवकर यांनी स्मार्ट बसचे व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांना महिला कंडक्टरांशी गैरवर्तन करणाऱ्या तिकीट तपासणीसांवर तातडीने कारवाई करा, नसता आम्ही येथून जाणार नाही, अशी भूमिका घेतली. भुसारी यांनी महिलांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. महिला वाहकांशी गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. दोषी तिकीट तपासणीसांवर कठोर कारवाई होईल. महिला वाहकांनी स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापनाविरोधात पत्रकारांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला. नव्याने देण्यात आलेल्या तिकीट मशीनमध्ये जमा झालेली रक्कम दिसत नाही. त्यामुळे तफावत आलेल्या रकमेची पूर्तता आम्हाला करावी लागते. पुरुष तपासणीसांकडून तपासणीच्या नावाखाली आमच्या पर्ससह साहित्यांची तपासणी करतात. गळ्यातील मशीन हाताने काढून घेतात. वारंवार अपमानीत करून सेवेतून काढून टाकण्याची धमकी देतात, अशा एक ना अनेक तक्रारी केल्या.
महिला कंडक्टरांशी गैरवर्तन, स्मार्ट सिटी कार्यालयासमोर निदर्शने
By | Updated: November 29, 2020 04:06 IST