अंबाजोगाई: राहत्या घरी खाजगी परिचारीकेच्या साह्याने गर्भपात करून त्या गर्भाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी पती- पत्नीसह गर्भपात करणाऱ्या परिचारिकेवर अंबाजोगाई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बानाईनगर परिसरातील राहणारे वैजनाथ आत्माराम पतकराव व त्यांची पत्नी सुनिता वैजनाथ पतकराव या दाम्पत्यास दोन मुली आहेत. सुनिता या तिसऱ्यावेळी गरोदर होत्या. त्यांच्या पोटात साडेचार महिन्यांचा गर्भ होता. हा गर्भ मुलीचाच आहे अशी धारणा झाल्याने त्यांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. गर्भपात करण्यासाठी खाजगी रुग्णालयातील परिचारिका धनश्री हिला बोलाविण्यात आले. तिला सर्व प्रकार त्यांनी सांगितला. ३० एप्रिल रोजी शहरातील धनश्री या परिचारिकेने सुनिता यांना विविध प्रकारची इंजेक्शन व गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. गर्भाची त्यांनी विल्हेवाट लावली. मात्र काही वेळानंतर सुनिता हिला गर्भपातामुळे मोठा त्रास होऊ लागला. यावर परिचारीका धनश्री हिने उपचार केले मात्र रक्तस्त्राव वाढल्याने सुनिता यांना पुढील उपचारासाठी तात्काळ स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्त्री रोग व प्रसुती विभागात उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या ही बाब लक्षात आली. उपचारादरम्यान त्या महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात आले. वैजनाथ आत्माराम पतकराव, सुनिता पतकराव व नर्स धनश्री यांच्यावर एम.टी.पी. कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला. (वार्ताहर)
गर्भपात प्रकरण; दाम्पत्यासह परिचारिकेवर गुन्हा दाखल
By admin | Updated: May 10, 2015 00:20 IST