औरंगाबाद : विद्यापीठाच्या कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेची रोज ३ हजार टेस्ट करण्याची क्षमता आहे; परंतु या प्रयोगशाळेला आवश्यक ऑटोमेशन कीट देण्यासाठी आरोग्य विभागाकडून सापत्न वागणूक मिळत असल्यामुळे येथे काम करणारे विद्यार्थी, कर्मचारी हतबल बनले आहेत. गुरुवारी प्रदीर्घ कालावधीनंतर या प्रयोगशाळेला ८ हजार ऑटोमेशन कीट प्राप्त झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘डीएनए बार कोडिंग सेंटर’मध्ये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या पुढाकाराने ‘सीएसआर फंडा’तून गेल्यावर्षी जुलै महिन्यापासून कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा सुरू झाली. सध्या या प्रयोगशाळेत रोज २ हजार ‘आरटीपीसीआर’ नमुन्यांची तपासणी केली जाते. आता ऑटोमेशन कीट उपलब्ध झाल्यामुळे रोज ३ हजार नमुन्यांची तपासणी केली जाऊ शकते. आतापर्यंत दहा महिन्यांमध्ये या प्रयोगशाळेने १ लाख ८० हजार कोरोना विषाणू नमुन्यांची तपासणी केली आहे.
सध्या या प्रयोगशाळेत विद्यापीठातील २५ संशोधक विद्यार्थी व एक वैद्यकीय अधिकारी असे एकूण २६ जण काम करत असून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेतन अदा केले जाते. प्रयोगशाळेचे कामकाज २४ तास तीन शिफ्टमध्ये सुरू आहे. ग्रामीण भागातील ‘आरटीपीसीआर’ नमुन्यांची तपासणी याठिकाणी केली जात असून प्राप्त नमुन्यांची तपासणी केल्यानंतर २४ तासाच्या आत संबंधितांकडे अहवाल पाठविला जात आहे. मागील दहा महिन्यांत आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून या प्रयोगशाळेला अवघे ५५०० एवढेच ऑटोमेशन तपासणी कीट प्राप्त झाले. या कीटमुळे कमी अवधित जास्त तपासण्या करता येतात. मात्र, ऑटोमेशन कीट उपलब्ध होत नसल्यामुळे याठिकाणी सर्व प्रक्रिया मॅन्युअली करण्यात येते. ही प्रक्रिया जास्त जोखमीची व वेळ घेणारी असते. दुसरीकडे, घाटी हॉस्पिटलमधील प्रयोगशाळेला आगाऊ ऑटोमेशन कीट दिले जातात. असा दुजाभाव आरोग्य यंत्रणेने करू नये, अशी भावना येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
चौकट.....
कोरोना विषाणू तपासणीची स्थिती...
दिनांक- विद्यापीठ- घाटी
२८ एप्रिल- १५२३- १६२८
२७ एप्रिल- १६१३- १८७०
२६ एप्रिल- २०२९- १४७०
२५ एप्रिल- १८४२- १९४२
२४ एप्रिल- २०३९- १९१९