हिंगोली : ‘लोकमत’ च्या वतीने गेल्या शैक्षणिक वर्षांत ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या ‘हवाई सफर’ स्पर्धेत हिंगोलीतील माणिक स्मारक आर्य विद्यालयाचा आठवीतील विद्यार्थी अभिषेक संजय मेथेकर हा मानकरी ठरला आहे. याबद्दल विद्यालयाच्या वतीने अभिषेकचा मंगळवारी एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. ‘लोकमत’ च्या वतीने ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमांतर्गत गेल्या शैक्षणिक वर्षांत १ जुलै ते १० आॅगस्ट २०१३ या कालावधीत जिल्ह्यात स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतून लक्की ड्रॉ द्वारे एका विद्यार्थ्याची ‘मुंबई-दिल्ली- मुंबई’ या हवाई सफरसाठी निवड करावयाची होती. त्यामध्ये हिंगोलीतील माणिक स्मारक आर्य विद्यालयातील आठवीचा विद्यार्थी अभिषेक संजय मेथेकर हा भाग्यवान ठरला. त्यामुळे अभिषेक आता लवकरच ‘मुंबई-दिल्ली-मुुंबई’ ही हवाई सफर करणार आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली येथील विविध एैतिहासिक स्थळांना भेटी देता येणार आहेत. तशी व्यवस्था ‘लोकमत’ च्या वतीने करण्यात येणार आहे. दरम्यान, या स्पर्धेतील हवाई सफर मानकरी ठरलेला विद्यार्थी अभिषेक मेथेकर याचा मंगळवारी माणिक स्मारक आर्य विद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी अभिषेकने मनोगत व्यक्त करताना ‘लोकमत’ चे संस्काराचे मोती सदर विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले. स्पर्धा परिक्षेसाठी त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे अभिषेक म्हणाला. यावेळी संस्थेचे विश्वस्त तथा प्रशासकीय अधिकारी अनिलकुमार भारूका यांनी ‘लोकमत’ च्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे सदर ‘लोकमत’ ने सुरू केले असून, त्याचा त्यांच्या भावी आयुुष्यात मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने संस्काराचे मोती या स्पर्धेत सहभागी होऊन आपले ज्ञान वृद्धींगत करावे, असे आवाहन भारूका यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक एस.यु. सूर्यवाड, उपमुख्याध्यापक एम.एम. लोकडे, पर्यवेक्षक एस.एस. क्यातमवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ए.एम. पत्की यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)
अभिषेक मेथेकर ‘लोकमत’ ‘हवाई सफर’ चा मानकरी
By admin | Updated: July 3, 2014 00:23 IST