कडा : महावितरणचा गलथान कारभार आजही सर्वसामान्यांच्या जिवावर बेतला आहे. आष्टी तालुक्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक गावे आजही अंधारातच जीवन जगत आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही याकडे महावितरणचे दुर्लक्ष असल्याचा आरोप येथील नागरिकांमधून केला जात आहे.आष्टी तालुक्यात सुमारे ३०० च्या आसपास वाड्या-वस्त्यांसह गावे आहेत. मागील महिनाभरापासून महावितरणकडून या गावांना व्यवस्थीत वीजपुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारही केली होती़ मात्र याची अद्यापही दखल घेतली गेली नसल्याने त्यांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.यावर्षी आष्टी तालुक्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यानंतर महिनाभरापूर्वी काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. याच पावसाने पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले होते.यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला होता. सध्या पिकांना पावसाची गरज भासत असल्याने प्रत्येक शेतकरी उपलब्ध पाणी पिकांना देण्यासाठी धडपड करू लागला आहे. मात्र शेतकऱ्यांकडे पाणी असूनही केवळ वीज नसल्याने ते पिकांना देता येत नसल्याची खंत शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.मागील महिन्यापूर्वी झालेल्या पावसाने विहीर, बोअर यांची पाणीपातळी काही प्रमाणात वाढली होती. मात्र शेतकऱ्यांकडे पाणी असतानाही केवळ महावितरणकडून व्यवस्थित वीजपुरवठा होत नसल्याने ते पिकांना देता येत नाही. ज्यावेळेस वीज असते त्यावेळेस विद्युत पुरवठा कमी दाबाने होत असल्याचे येथील रामभाऊ कांबळे या शेतकऱ्याने सांगितले.येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला संतापआष्टी तालुक्यातील हातोला, मैंदा, मोराळा, पाटसरा आदी गावांना आजही वीज नाही. त्यामुळे येथील नागरीकांमध्ये तीव्र संताप आहे़ अशा या दुर्गम भागातील गावांकडे महावितरण जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप दादा जगताप आणि संजय खंडागळे यांनी केला आहे.चोरीच्या प्रमाणातही झाली वाढविजेचा लपंडाव होत असल्याने चोरीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. मागील काही दिवसात आष्टी परिसरात छोट्या-मोठ्या चोऱ्या झालेल्या आहेत. अंधाराचा फायदा घेत चोर चोरी करून पसार होत असल्याचा आरोपही ग्रामीण भागातील नागरीकांमधून होत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची जोर धरू लागली आहे़याबाबत आष्टीचे अभियंता राहुल जायभाये म्हणाले, नागरिकांनी त्यांच्याकडील थकीत वीज बील भरून महावितरणला सहकार्य करावे़ सध्या सर्वच शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंपाचा वापर करीत आहेत़ त्यामुळे वीजपुरवठ्यावर दबव येत आहे़ वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. (वार्ताहर)
आष्टी तालुक्यात विजेचा लपंडाव ...!
By admin | Updated: October 14, 2014 00:34 IST