औरंगाबाद : शहरातील धार्मिक स्थळांच्या कारवाईवरून खा.चंद्रकांत खैरे यांनी मनपा व आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यावर आगपाखड केली, तर आजी-माजी आमदारांनी विकास आराखड्यातील रस्त्यांत येणारी धार्मिक स्थळे हटविण्याची मागणी करून आयुक्तांची बाजू लावून धरली. आज सकाळी धार्मिक स्थळांच्या कारवाईनंतर महापौर कला ओझा यांच्या दालनात दुपारी पदाधिकार्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला खा.खैरे यांच्यासह आ.जैस्वाल, माजी आ. तनवाणी, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, सभागृह नेता सुशील खेडकर, गटनेता गजानन बारवाल, अफसर खान, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आयुक्त डॉ.कांबळे, अधिकारी शिवाजी झनझन आदींची उपस्थिती होती. खा. खैरे यांनी आज पुन्हा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यावर आगपाखड करून राग व्यक्त केला, तर आ.जैस्वाल आणि माजी आ. तनवाणी यांनी रस्त्यांतील धार्मिक स्थळे हटविण्याची गरज व्यक्त केली. त्या दोघांनीही विकास आराखड्यातील रस्त्यांत येणारी धार्मिक स्थळे हटविण्याची मागणी लावून धरली. खा.खैरे यांनी कारवाईवरून संताप केला, तर आजी-माजी आमदारांनी मनपाचा अप्रत्यक्षरीत्या सन्मान केला. तत्कालीन आयुक्त डॉ.भापकर यांनी केलेल्या पाडापाडीत नागरिकांना मालमत्तेचा मावेजा मिळालेला नाही. रस्त्यांतून जीटीएलचे खांबही हटविण्यात आलेले नाहीत. मनपाने ती कामे आधी केली पाहिजेत, असे खा.खैरे म्हणाले. आयुक्त म्हणाले, ही कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार केली जात आहे. त्यात पालिका, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालयाचा सहभाग आहे. नागरिकांनी शांततेने सहकार्य केले. काही ठिकाणी तर नागरिकांनी स्वत:हून धार्मिक स्थळे काढून घेतली. शांतता आणि संयमाने ही कारवाई झाली. कारवाईतून संदेश... पालिकेने धार्मिक स्थळे हटविण्यास प्रारंभ केल्यामुळे त्या कारवाईतून प्रशासन काहीही निर्णय घेऊ शकते, असा संदेश गेला आहे. कुठल्याही राजकीय दबावाला न जुमानता मनपा, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांची मानसिकता बदलली आहे. कुठूनही दबाव आला तरी कारवाई होणारच हे लोकांना पटल्याने कुठेही तणाव निर्माण झाला नाही. शांतता आणि संयम... शहर संवेदनशील असल्यामुळे धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा प्रयत्न जरी झाला, तर मोठा राडा होईल, असे वाटायचे. मात्र, तत्कालीन आयुक्त डॉ.भापकर यांच्यानंतर आयुक्त डॉ.कांबळे यांनी शांतता आणि संयमाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कुठेही भेदभाव न होता ही कारवाई व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
आजी,माजी आमदार आयुक्तांच्या बाजूने
By admin | Updated: May 30, 2014 01:03 IST