भूसंपादनासाठी ३५० कोटी : ११० हेक्टर जमीन लागणार योजनेसाठी
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील सर्व जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी तयार केलेल्या महत्त्वाकांक्षी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक दोनच्या भूसंपादनासाठी जवळपास ३५० कोटी लागणार असून, ९०० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत योजनेच्या कामाला गती येण्याची शक्यता आहे. योजनेसाठी न्यायालयाच्या परवानगीने भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरू असून, भूसंपादन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून लवकरच त्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
११० हेक्टरपेक्षा अधिक जमिनीचे संपादन २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार होणार आहे. चारपट रक्कम भूसंपादनासाठी द्यावी लागणार आहे. त्यामुळे योजनेची किंमत ९०० ते १ हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे. हेक्टरी रक्कम भूसंपादनासाठी मावेजा द्यावा लागणार असून, जमीन सर्वेक्षणानंतर पुढील निर्णय होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील योजनेसाठी भूसंपादनासाठी मागील दहा वर्षांत गतीने निर्णय झाले नाहीत. तसेच योजनेसाठी निर्धारित केलेली रक्कमदेखील उपलब्ध झाली नाही, त्यामुळे भूसंपादन रखडले. भूसंपादन करण्यासाठी येत्या काही महिन्यांत सर्व्हे होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.