लोकमत न्यूज नेटवर्कजालना: राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दिशेने शासनाने पावले उचलली आहेत. त्यानुसार २० पेक्षा कमीपट संख्या असलेल्या जिल्ह्यातील ९५ शाळांचे भवितव्य अधांतरी सापडले आहे, तर या शाळांतील १८३ शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. खर्चाचा भार कमी करण्यासाठी शाळांची पूर्णत: आवश्यकता तपासावी. मुलांची संख्या कमी असलेल्या अर्थातच कमी पटसंख्येच्या शाळांची संख्या निश्चित करावी. येथील विद्यार्थ्यांना सोयीनुसार लगतच्या शाळेत पाठविणे शक्य आहे का हे पाहावे, अशा सूचना वित्त विभागाने काढल्या आहेत. जिल्ह्यातील शाळांमधील यंदाच्या शैक्षणिक वर्षातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांची निश्चित सप्टेंबरमध्ये करण्यात येणार आहे. सध्या शिक्षण विभागाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार जालना जिल्ह्यात १ ते २० पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ९५ असून, या शाळांवर १८३ शिक्षक कार्यरत आहेत.भोकरदन तालुक्यात सर्वाधिक २४ तर, मंठा तालुक्यातील १९ शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. असे असले तरी एका शाळेवर किमान दोन शिक्षक कार्यरत असल्यामुळे कमी पटसंख्येच्या ९५ शाळांवरील १८३ शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होणार आहे.पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता ओढा, ग्रामीण भागातून कामानिमित्त होणारे स्थलांतर यामुळे ग्रामीण भागात अनेक शाळांतील पटसंख्या घसरली आहे. त्यामुळे अशा शाळांचे भवितव्य शासनाच्या नवीन निर्देशानुसार सध्या अधांतरी असल्याचे चित्र आहे.
९५ शाळांवर टांगती तलवार !
By admin | Updated: July 12, 2017 00:40 IST