फुलंब्री : कोरोनाची लस सर्वात आधी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण आहे, तर काही ठिकाणच्या कर्मचाऱ्यांमध्ये साईडइफेक्टच्या भीतीने दुसऱ्या टप्प्यात कोरोनाची लस घ्यावी, अशी भावना आहे. औरंगाबाद ग्रामीणमध्ये जवळपास ८७ टक्के डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कही खुशी, कही गम असल्याचे चित्र दिसून आले आहे.
कोरोना महामारीच्या काळात फ्रंटलाईन म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस घेण्यासाठी ८७ टक्के डॉक्टर अन्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. जिल्ह्यात ८ लाख २६ हजार लसींची साठवणूक करण्यासाठी ६७ केंद्रे उभारली जात आहेत. लसीकरणासाठी सगळीकडे युद्धपातळीवर तयारी केली आहे.
-----------
१३ टक्के कर्मचाऱ्यांची नोंदणी अद्याप सुरू
जिल्ह्यात ग्रामीण भागात १३,०७७ आरोग्य कर्मचारी आहेत. त्यापैकी ११,३९३ कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केलेली आहे. त्यांची टक्केवारी ८७.१२ अशी झाली असून, उर्वरित १३ टक्के कर्मचारी देखील लवकरच नोंदणी करतील. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात लसीकरण शंभर टक्के केले जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले, तर यात औरंंगाबाद शहरातील कर्मचाऱ्यांचा समावेश नाही. त्यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून स्वतंत्र यंत्रणा उभारली गेली आहे.
----------
कोट....
कोरोना लसीकरण मोहीम येत्या १५ दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्हाभरात सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे. लसीपासून कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही. ब्रिटनमध्ये नव्याने आलेल्या कोरोना व्हायरसवरदेखील ही लस उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
----
प्रतिक्रिया
लसीबद्दल कोणतीही भीती नाही
कोरोना लसीकरणासाठी मी पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेली आहे. या लसीबद्दल मला कोणतीही भीती वाटत नाही, अशी प्रतिक्रिया फुलंब्री आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
----
कोरोनाच्या काळात फ्रंटलाइनला काम करता आले. त्यामुळे भीती अजिबात वाटत नाही. कोरोना लसीबद्दल भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. मी नोंदणी केली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात नक्कीच त्याचा लाभ घेणार आहोत, असे फुलंब्री येथील आरोग्य कर्मचारी महिलेने सांगितले.
----------
पॉइंटर्स
जिल्ह्यातील एकूण डॉक्टर संख्या : १३,०७७
लसीकरणासाठी नोंदणी झालेले डॉक्टर : ११,३९३