लातूर : पाडव्यानिमित्त सोमवारी सकाळी सुरू झालेल्या आडत बाजारात सोयाबीनची विक्रमी विक्री केली. मंगळवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचे माप सुरू होते. जवळपास ८३ हजार क्विंटल सोयाबीनचे माप झाले असून, सौदा ३०५० रुपयांचा निघाला असला तरी पोटलीत २७०० रुपयांचा भाव मिळाला. सर्वसाधारणपणे २७०० च्या भावाने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली असून, २२ कोटी ४१ लाख रुपयांची पट्टी झाली आहे. पाडव्याला चांगला भाव मिळतो, असा शेतकऱ्यांचा पूर्वानुभव आहे. मात्र पाडव्याच्या अगोदर दोन दिवस आडत बाजार बंद होता. त्यापूर्वीच शेतकऱ्यांनी आडतीवर सोयाबीन स्टॉक केले होते. भाव चांगला येईल म्हणून पाडव्यालाच माप करायचे, असे ठरविले. त्यानुसार सोमवारी सकाळपासून सर्वच आडतींवर माप घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होती. मंगळवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत बहुतांश आडतीवर माप सुरू होते. मंगळवारी पहाटेपर्यंत ८३ हजार क्विंटलचे माप झाल्याचे सचिवांनी सांगितले.
८३ हजार क्विंटल सोयाबीनचे माप
By admin | Updated: November 2, 2016 01:01 IST