-----------------------------
कंपनीच्या दोघांना मारहाण
वाळूज महानगर : कंपनीत काम करणाऱ्या प्रोडक्शन इंचार्ज व त्याच्या सुपरवायझर मुलास बेदम मारहाण करणाऱ्या ५ जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुरेश त्र्यंबकराव गात (४५) हे स्टारवेज कंपनीत प्रोडक्शन इंचार्ज तर त्यांचा मुलगा तुषार हा सुपरवायझर म्हणून काम करतो. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुरेश गात यांनी कामगार नामदेव चित्ते याला मशीन साफ करण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार देत बँकेत काम असल्याचे सांगून निघून गेला. सायंकाळी ४.१५ वाजेच्या सुमारास नामदेव चित्ते याचा मुलगा रोहितने कंपनीत येऊन सुरेश गात व तुषार याला कंपनीच्या गेटसमोर बोलावून घेतले. यानंतर रोहित चित्ते याने ५ साथीदारांसह पिता-पुत्रास बेदम मारहाण केली. इतर कामगारांनी मध्यस्थी करून आरोपीच्या तावडीतून या पिता-पुत्राची सुटका केली. याप्रकरणी सुरेश गात यांच्या तक्रारीवरून रोहित चित्ते व त्याच्या ५ साथीदारांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------------