औरंगाबाद : शहरात दुचाकी चोरट्यांची धूूम सुरू आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीपैकी १५ ते २० टक्के दुचाकी चोरट्यांकडून जप्त करण्यात येतात तर दहा टक्के गाड्या बेवारस अवस्थेत सापडतात. उर्वरित दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडाही होत नाही. चोरीला जाणाऱ्या एकूण दुचाकीपैकी ८० टक्के दुचाकी भंगारात विक्री केल्या जात असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. यातून चोरट्याला कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये मिळतात.औरंगाबाद शहरात १५ पोलीस ठाणी आहेत. जानेवारीपासून मे अखेरपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागांतून सुमारे चारशे दुचाकी चोरीला गेल्या आहेत. यात सिडकोमधून ६६, क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हदद्ीतून ६२ आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ४३ मोटारसायकल चोरीला गेल्या. दुचाकी चोरल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत शहराबाहेर कसे बाहेर पडता येईल, याचा अभ्यास करून चोर दुचाकी चोरी करतात, त्यामुळे या ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक दुचाकी चोऱ्या होतात,असे पोलिसांचे म्हणणे आहे. एमआयडीसी वाळूज, जवाहरनगर आणि सिटी चौक पोलिस ठाण्यांच्या परिसरातून पाच महिन्यात सुमारे ४० दुचाकी चोरट्यांनी पळवल्या आहेत. तर त्यापाठोपाठ जिन्सी पोलीस ठाण्याच्या परिसरातून चोरट्यांनी पाच महिन्यांत २२ दुचाकी चोरून नेल्या होत्या. दुचाकी चोरी रोखण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी सापळे रचतात. मात्र यात त्यांना यश मिळतेच, असे नाही. परिणामी दुचाकी चोरी उघड होण्याचे प्रमाण जास्तीत जास्त २० टक्के आहे.बेवारस अवस्थेत सोडून देतातकाही चोरटे चोरलेल्या दुचाकींचा कामापुरता वापर करतात. चोरीच्या दुचाकीत जोपर्यंत पेट्रोल आहे, तोपर्यत तिचा वापर करणे आणि जेथे पेट्रोल संपेल, तेथे दुचाकी सोडून निघून जाण्याची त्यांची पद्धत आहे. अशा प्रकारे शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेवारस अवस्थेत सोडून दिलेल्या दुचाकी सापडतात. बऱ्याचदा या दुचाकीवरील क्रमांक बनावट असतो आणि चोरटे चेसीस क्रमांकाचीही खाडाखोड करीत असतात. त्यामुळे दुचाकीचा मालक पोलिसांना सापडत नाही. परिणामी अशा बेवारस दुचाकींचा भंगारात लिलाव करून त्यांची विक्री केली जाते. अशा प्रकारे शहरातील सुमारे साडेसहाशे दुचाकींची चार महिन्यापूर्वी पोलीस आयुक्तालयांत विक्री करण्यात आली.
चोरीच्या ८० % दुचाकी भंगारात
By admin | Updated: July 15, 2016 01:07 IST