सेलू ..पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या विविध रोगांची लागण रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सेलू तालुक्यातील सार्वजनिक पाणी स्त्रोताचे नमुने घेवून तपासणी केली असता आठ पाण्याचे स्त्रोत दूषित आढळले आहेत़ आरोग्य विभागाच्या वतीने देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील पस्तीस सार्वजनिक पाणी स्त्रोताची तपासणी केली असता यातील चार नमुने दूषित आढळले आहेत़ यात ढेंगळी पिंपळगावातील दोन व राधेधामण गावातील दोन पाणी स्त्रोतांचा समावेश आहे़ तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वालूर अंतर्गत येणाऱ्या गावातील वीस पाण्यांचे नमुने तपासले असून यातील बोरगाव जहांगीर येथील दोन पाणी स्त्रोत दूषित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे़ उपजिल्हा रूग्णालया अंतर्गत सेलू शहरातील २० सार्वजनिक पाणी स्त्रोताची तपासणी केली असता आंबेडकरनगर व पांडे गल्लीतील नमुने दूषित आढळले आहेत़ दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे पावसाळयात गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ या रोगाची लागण होते़ त्यामुळे पावसाळयाच्या दिवसांत आरोग्य विभागाच्या वतीने सार्वजनिक ठिकाणच्या स्त्रोतांची तपासणी केली जाते़ यात शहरातील हातपंपाच्या पाण्याचे तर ग्रामीण भागात हातपंपासह पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाण्याचे नमुने सेलूतील उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रयोगशाळात तपासल्या जात आहेत़ दूषित स्त्रोत आढळल्यास आरोग्य विभागाच्या वतीने संबंधित यंत्रणेला पाण्याचे स्त्रोत शुद्ध करण्यासाठी ब्लीचिंग पावडर व त्या परिसरातील स्वच्छता करण्याच्या सुचना देण्यात येतात़ संततधार पावसामुळे दूषित पाणी आढळले आहे़ त्यामुळे काही गावातील नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली होती़ सेलू येथील उपजिल्हा रूग्णालयात गॅस्ट्रोची लागण झालेल्या परिसरातील रूग्णांवर उपचार करण्यात आले़
सेलू तालुक्यातील आठ पाण्याचे स्त्रोत दूषित
By admin | Updated: September 4, 2014 00:19 IST