हदगाव : हदगाव पोलिस ठाण्यातून गत चार वर्षांत आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याची बाब समोर आली आहे. यापैकी एकाही पोलिस निरीक्षकाने आपला कार्यकाळ पूर्ण केला नाही किंवा त्यांना कार्यकाळ पूर्ण करु देण्यात आला नाही. परिणामी शासकीय कामात राजकीय हस्तक्षेप किती वाढला याचे हे उदाहरण असल्याची चर्चा रंगत आहे.७ मार्च २०१० रोजी उत्तम मुंडे यांनी पदभार घेतला. ते ७ मार्च २०११ पर्यंत कार्यरत होते. यानंतर पी. जी. गायकवाड यांनी ७ मार्च २०११ रोजी पदभार घेतला. यानंतर ४ एप्रिल २०११ रोजी त्यांची बदली झाली.यानंतर आर. बी. केंद्रे ४ एप्रिल २०११ ते २२ सप्टेंबर २०१३ पर्यंत राहिले. यानंतर २२ सप्टेंबर २०१३ ते १३ नोव्हेंबर २०१३ पर्यंत राजा टेहरे यांनी कारभार स्वीकारला. दोन महिन्यांतच ते बाद झाले. यानंतर १४ नोव्हेंबर १३ ते ३ मार्च १४ काळात साहेबराव नरवाडे रुजू झाले. यानंतर ३ मार्च २०१४ रोजी अरुण बस्ते जालन्यावरुन येथे रुजू झाले. हिमायतनगर येथून लोहा येथे गेलेले गौतम यांची पुन्हा हिमायतनगरला बदली झाली. रमेशकुमार स्वामी हे हदगावला आले. शासन जीआरप्रमाणे एका पोलिस निरीक्षकचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. परंतु तक्रारीमुळे त्यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली जाते. हदगाव शहरात शासकीय कर्मचाऱ्यांना राजकीय दबावाचे बळी व्हावे लागते किंवा ठाण्यातील अंतर्गत कलहाचाही फटका बसत आहे. राजकीय पुढाऱ्याला किंवा त्यांच्या कार्यकर्त्याची नाराजी ओढवून घेतल्यास त्यांची बदली करण्यात येत आहे. यामुळे गुन्हेगारीवृत्तीला आळा बसण्याऐवजीे भर पडत आहे. कोणतेही कारण नसताना होणाऱ्या बदल्यामुळे उलट-सुलट चर्चा रंगत आहे.(वार्ताहर)
हदगावात ४ वर्षांत ८ पोलिस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या
By admin | Updated: July 10, 2014 00:44 IST