लातूर : प्रत्यक्ष शेतात न जाता कार्यालयात बसून नकाशा तयार करणे व क्षेत्र मोजणी करणे यामुळे सरासरी १० पैकी ८ मोजण्या भूमीअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून चुकीच्या निघतात. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतात. परिणामी, ७० ते ८० टक्के प्रकरणांचा निपटारा होत नाही. शिवाय, शेतकऱ्यांचा खर्च व वेळ वाया जातो, असे गाऱ्हाणे जमावबंदी आयुक्तालय पुणे, भूमीअभिलेख उपसंचालक औरंगाबाद यांच्याकडे लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मांडले आहे.लातूर तालुक्यातील तांदुळजा, कानडी बोरगाव, टाकळगाव येथील काही शेतकऱ्यांच्या शेत जमिनीची मोजणी उपाधीक्षक भूमिअभिलेख लातूर कार्यालयाकडून करण्यात आली होती. मोजणी क्रमांक ३६०/२००१ प्रमाणे मोजणी केली. लगतच शेतकऱ्याने जुलै २००१ साली मोजणी रजिस्टर क्रमांक २४७/२००१ प्रमाणे मोजणी केली. दोन्हीही मोजणीमध्ये तफावत आढळून आली. परत त्यामध्ये तपासणी होऊन मोजणी रजिस्टर क्रमांक प्रमाणे मोजणी नकाशा तयार झाला. लगतच्या धारकाने त्याच्या मोजणीप्रमाणे न्यायालयात मनाई हुकूम दावा दाखल केला. संयुक्त मोजणीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. केवळ मोजणीत तफावत आल्याने न्यायालयाची दारे शेतकऱ्यांना ठोठवावी लागत आहेत. एकूण दहा मोजणी प्रकरणांपैकी किमान सात ते आठ प्रकरणांत चुकीची मोजणी निघत आहे, असा आरोप तांदुळजा येथील अॅड. अनंत संपतराव बावणे यांनी केला आहे. तांदुळजा येथे मोजणी क्रमांक २६७/१३, मोजणी क्रमांक १४९/०८, मोजणी क्र. १०१/२०००, १७०६/२०११, कानडी बोरगाव येथे ३७९८/११, तांदुळजा, टाकळगाव व कानडी बोरगाव येथे २४१२/१२, २४१३/१२, १३३१/१२, ३२/१२, तांदुळजा येथे २३०३/१२, २९०/०२, २९०/०३ मध्ये शेतकऱ्यांनी शुल्क भरून मोजणी केली. परंतु, भूमिअभिलेख कार्यालयाकडून चुकीची मोजणी झाली. या मोजणीमध्ये कोर्टात अहवालाविरुद्ध जबाब, प्रत्यक्ष शेतात न येता कार्यालयात बसून नकाशा तयार करणे, अतिक्रमण धारकांच्या सांगण्यावरून हद्दी केल्या नाहीत व नकाशा दिला नाही. जास्तीच्या क्षेत्राचा नकाशा तयार केला. हद्दी खुणा न दाखविता खोटा पंचनामा तयार केला. अर्धवट हद्दी खुणा दाखविल्या व कायम पंचनामा केला नाही. दोन वेगवेगळे नकाशे तयार केले, आदी त्रुटी या मोजणीत आल्या आहेत. याबाबत बंदी आयुक्तालय पुणे, भूमिअभिलेख उपसंचालक औरंगाबाद यांच्याकडे दाद मागितली. मात्र या वरिष्ठ कार्यालयाने जिल्हा व तालुका कार्यालयाला चौकशी करण्याचे निर्देश दिले. या दोन्हीही कार्यालयाने तक्रारकर्त्यांना विचारात न घेता स्वतंत्र अहवाल पाठवून दिला, तोही एकतर्फी, असे अॅड. अनंत बावणे यांचे म्हणणे आहे.साधी मोजणी, तातडीची मोजणी आणि अतितातडीच्या मोजणीसाठी नियमानुसार शुल्क भरून शेत जमिनीच्या मोजण्या करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालय कार्यरत आहे. मात्र या कार्यालयातील कर्मचारी बेजबाबदारपणे मोजण्या करतात. त्यामुळे मोजणीमध्ये तफावत येते. तांदुळजा येथील प्रस्तुत प्रकरणांमध्ये अशाच तफावती आल्या आहेत. या संदर्भात जमावबंदी आयुक्त आणि भूमिअभिलेख उपसंचालकांकडे दाद मागितली. परंतु, कनिष्ठ कार्यालयाने एकतर्फी चौकशी अहवाल दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच असल्याचे अॅड. अनंत बावणे यांनी सांगितले.
१० पैकी ८ मोजण्या चुकीच्या !
By admin | Updated: May 18, 2015 00:20 IST