औरंगाबाद : दिल्ली - मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेंद्रा - बिडकीन मेगा पार्कच्या कामाला वेग आला आहे. मेगा पार्कची उभारणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशिप लिमिटेड या विशेष हेतू कंपनीतर्फे पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी येत्या काही दिवसांतच ७२५ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. याअंतर्गत रस्ते, पूल, वीजप्रणाली, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प व पाणीपुरवठ्याची कामे केली जाणार आहेत. ही कामे करण्यासाठी अडीच वर्षांची मुदत दिली जाणार आहे.‘डीएमआयसी’च्या पहिल्या टप्प्यात शेंद्रा - बिडकीन मेगा पार्कच्या पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी केंद्र सरकारने १,५३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. पहिल्या टप्प्यात शेंद्रा व करमाड परिसरात ८४६ हेक्टर क्षेत्रावर पायाभूत सुविधांची उभारणी केली केली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क न्व्हेंशन सेंटर व बिडकीन परिसरात पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहेत. शेंद्रा - बिडकीन मेगा पार्कची उभारणी करण्यासाठी औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशिप लिमिटेड (एआयटीएल) या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहत ते करमाड या मार्गावर तसेच लाडगाव आणि करमाड या मार्गावर दोन उड्डाणपूल बांधण्यासाठी ‘एआयटीएल’ तर्फे ७७ कोटी ६२ लाख रुपयांच्या निविदा २९ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या कामासाठी दीड वर्षाची कालमर्यादा असणार आहे. उड्डाणपुलाच्या निविदानंतर आता पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ७२५ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातून अंतर्गत रस्ते, गटार, किरकोळ पूल बांधणे, सांडपाणी प्रकल्प, वीजप्रणाली व पाणीपुरवठ्याची कामे केली जातील, अशी माहिती ‘एआयटीएल’चे संचालक आणि माजी विभागीय आयुक्त भास्कर मुंढे यांनी दिली. जायकवाडीचेच पाणीशेंद्रा - बिडकीन मेगा इंडस्ट्रीयल पार्कसाठी जायकवाडी धरणातूनच पाणीपुरवठा केला जाणार आहे. वाळूज, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहतीस जायकवाडी धरणातूनच पाणीपुरवठा केला जातो. या वसाहतींना पाणीपुरवठा केल्यानंतरही जायकवाडी धरणात उद्योगांसाठी पुरेसा पाणीसाठा असल्याने मेगा पार्कसाठी जायकवाडीतूनच पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे मुंढे म्हणाले.
७२५ कोटींच्या निविदा लवकरच निघणार
By admin | Updated: August 4, 2015 00:27 IST