जालना : येथील पोलिस प्रशिक्षण विद्यालयातील १३५ प्रशिक्षणार्थी पोलिसांना शनिवारी अन्नातून विषबाधा झाली होती. त्यातील ६३ प्रशिक्षणार्थींवर दुसऱ्या दिवशीही जिल्हा रूग्णालयात उपचार सुरूच होते. दरम्यान, त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.पोलिस प्रशिक्षण विद्यालयातील १३५ प्रशिक्षणार्थींना शनिवारी जेवणानंतर उलट्या व मळमळीचा त्रास सुरू झाला. त्यांना सायंकाळी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. शनिवारी रात्री उशिरापर्यंत एकूण १३५ प्रशिक्षणार्थ्यांनी दाखल झाले होते. त्यातील ७२ प्रशिक्षणार्थींवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अद्याप ६३ जणांवर उपचार सुरूच असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील ६ जणांनी उपचारा दरम्यान सलाईन स्वत:च काढून घेतले. रूग्णालय प्रशासनास न कळविताच सदर प्रशिक्षणार्थी रूग्णालयातून निघून गेले होते. त्या सहाही रूग्णांना परत बोलवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
६३ प्रशिक्षाणार्थींवर अद्याप उपचार सुरूच..!
By admin | Updated: December 20, 2015 23:48 IST