उस्मानाबाद : ३० सप्टेंबर २०१७ अखेर जिल्हा पाणंदमुक्त करण्याचा निरधार जिल्हा परिषदेकडून करण्यात आला आहे. यासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाभरातील सुमारे ५७७ ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेची गुढी उभारून गाव पाणंदमुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले. साधारणपणे तीन-चार वर्षांपूर्वी जिल्हा स्वच्छ भारत अभियानात ‘टॉपटेन’मध्ये होता. वैैयक्तिक शौचालाचे प्रमाण झपाट्याने वाढत होते. परंतु, मध्यंतरीच्या काही महिन्यात शौचालये बांधूनही लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वेळेवर मिळाली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवावे लागले. या प्रकारामुळे मागील पाच ते सहा महिन्यात स्वच्छ भारत अभियानचे काम अक्षरश: ढेपाळले. टॉपटेनमध्ये असलेला जिल्हा तळाला गेला. हे चित्र बदलण्यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी लक्ष घालून अभियानला पुन्हा गती देण्याच्या अनुषंगाने पाऊले उचलली आहेत. ‘स्वच्छतेची गुढी’ हा याचाच एक भाग आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेची गुढी उभारून ३० सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत गाव पाणंदमुक्त करण्याची शपथ घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळीच जिल्हाभरातील लोहारा तालुका वगळता उर्वरित सात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींसमोर स्वच्छतेची गुढी उभारण्यात आली. तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह ग्रामसेवकांनी एकत्र येत स्वच्छतेची शपथ घेतली. सप्टेंबर अखेरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत गाव पाणंदमुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी केला.(प्रतिनिधी)
५७७ ग्रामपंचायतीत स्वच्छतेची गुढी
By admin | Updated: March 29, 2017 00:14 IST