नळदुर्ग : मटका खेळण्यासाठी बनावट नोटा वापरल्या जात असल्याची माहिती मिळताच येथील सपोनि रमाकांत पांचाळ यांनी सापळा रचून एका ३५ वर्षाच्या युवकास ५५ हजाराच्या बनावट नोटासह ताब्यात घेतले. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील जळकोट व काक्रंबा येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील सिद्धेश्वर पंडित कबाडे (वय ३५, ह. मु. नरेगाव पुणे) हा पुणे येथे बांधकाम व्यवसायात कार्यरत आहे. पत्नी माहेरी आल्यामुळे तिला घेण्यासाठी हा खुदावाडी येथे आला होता. दरम्यान, सोमवारी दुपारी अणदूर येथे एका ठिकाणी २० हजाराचा मटका लावून पुढील मटका खेळण्यासाठी जळकोट येथे जात होता. दरम्यान, अणदूर येथे दिलेल्या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधिताने बुकी एजंटला याची कल्पना दिली. त्यानुसार बुकीकडेही बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले. तोपर्यंत पोलिसांपर्यंत ही माहिती जावून धडकली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यावेळी १००० ेरुपयांच्या २ डी.एम. ८५९८११, डीडीएम-८६४९६३, २ डीएम ८६७०७१, २ डीएम ८६७१०५, २ डीएम ८६८३१८ या सिरीजमधील एकंदरीत ४९ नोटा तर ५०० रुपयाच्या ओएसपी ९९१६८७ या सिरीजमधील मधील १२ नोटा मिळाल्या. सदर नोटा हुबेहुब असून त्यावर गर्व्हनर म्हणून रघुरामजी राजन यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, कोलकता येथील मजूर पुरवठा करणाऱ्या इसमाने त्यास ठेका पुरविण्यासाठी घेतलेले पैसे परत देताना सदर ६० हजार रुपये दिल्याचे या इसमाने पोलिसांना सांगितले. यासंदर्भात नळदुर्ग पोलिसात उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. सपोनि रमाकांत पांचाळ म्हणाले, आरोपीकडून ५५ हजार नोटा जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या इसमाकडून मोठे रॅकेट उघड होण्यास मदत होईल. सदर कार्यवाही सपोनि रमाकांत पांचाळ, पोउपनि विजयकुमार वाघ, रियाज पटेल, हेकाँ. खलील शेख, हेकॉ. राजाभाऊ सातपुते व अमोल तांबे यांनी केली. दरम्यान, पोलिसांकडून मटका बुकीवर काय कारवाई होते, याकडेही आता लक्ष लागले आहे.
५५ हजारांच्या बनावट नोटा जप्त
By admin | Updated: May 23, 2016 23:56 IST