औरंगाबाद : वेदमंत्रोच्चारात ७०० भाविकांनी ५१ कुंडी यज्ञात आहुती अर्पण केली. विविध औषधी वनस्पतींचा वापर आहुतीत करण्यात आला होता. यामुळे वातावरण मंगलमय बनले होते. यज्ञ सोहळा पाहून आत्मशांती मिळाल्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केल्या. हेच या आयोजनाचे फलित होय. गायत्री परिवाराच्या वतीने स्टेशन रोडवरील टकसाळी मंगल कार्यालयात चारदिवसीय गायत्री महायज्ञ व संस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटे शेकडो भाविक यज्ञस्थळी जमले होते. ६.३० वाजता समूह साधनेला सुरुवात झाली. यासंदर्भात गायत्री विद्यापीठाचे प्राचार्य कैलास महाजन यांनी सांगितले की, राष्ट्रीय एकतेच्या दृष्टीने सामूहिक साधना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यावेळी सामूहिकरीत्या ‘गायत्री मंत्र’ म्हणण्यात आले. सकाळी ७.३० वाजता गायत्री महायज्ञाला सुरुवात झाली. ५१ कुंड तयार करण्यात आले होते. यावेळी वेदमंत्रोच्चारात ७०० भाविकांनी औषधी वनस्पतींची आहुती अर्पण केली. यज्ञ कर्मकांड नव्हे तर महाविज्ञान आहे, याची माहिती प्रारंभी देण्यात आली. अश्वगंधा, नागरमोथा, तेजपत्र इ. वनस्पतीची आहुती दिल्याने वातावरण प्रसन्न झाले होते. प्रदूषणमुक्तीसाठी सर्वांनी संकल्प केला. सायंकाळी २० मिनिटांची नादयोग सामूहिक साधना करण्यात आली. त्यानंतर संगीत-प्रवचन झाले. शनिवारी सायंकाळी गायत्री दीप महायज्ञ करण्यात येणार आहे. २४ हजार दिवे यावेळी भाविक प्रज्वलित करणार असल्याची माहिती राजेश टाक यांनी दिली.
७०० भाविकांची ५१ कुंडी यज्ञात आहुती
By admin | Updated: January 3, 2015 00:17 IST