जालना : शहरासह जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी पोलीस पथकासह शहरात बुधवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत कोम्बींग आॅपरेशन राबवून ५ संशयितांसह २ दुकानदारांवर कारवाई केल्याने रात्री बेरात्री दुकाने सुरू ठेवणाऱ्यांत धास्ती पसरली आहे.परतूर सारख्या घटनेची पुनरावृत्ती होवू नये यासाठी जिल्ह्याच्या सर्वच ठाणेप्रमुखांना खबरदारी घेण्याच्या सूचना सिंह यांनी दिल्या आहेत. शहरातील आढावा घेण्यासाठी रात्री बारा वाजता पोलीस अधीक्षक यांनी टाऊन हॉल येथून कोम्बीग आॅपरेशनला सुरूवात केली. चमन, कैकाडी महोल्ला, माळीपुरा, कसबा, लक्कडकोड, बसस्टॅड, देऊळगाव राजा रोड, बडी सडक, शिवाजी पुतळा, मंगळबाजार, दर्गाबेस, काद्राबाद, सुभाष रोड, भोकरदन नाका, औरंगाबाद चौफूली, चंदनझिरा, टोलनाका आदी परिसरात सिंह यांनी कोम्बिंग आॅपरेशन करून तपासणी करीत काहींना चोप दिला. शहरात संशयितरित्या फिरणाऱ्या पाच जणांवर आणि मुंबई पोलीस अॅक्ट नुसार करवाई करण्यात आली. तसेच दोन दुचाकी चालक आणि तीन चारचाकी वाहनांवर सुध्दा दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले बसस्थानक परिसरात असलेले एक हॉटेल आणि एक बिअर शॉपी उघडी असल्याचे सिंह यांच्या लक्षात आल्याने सिंह यांनी संबंधितांना चांगलाच चोप दिला. रात्री ११ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा असताना अनेकजण दुकानाचे शटर बंद करून आतमधून दुकाने सुरू ठेवत आहेत. याची गंभीर दखल घेत कारवाई केली. दोन्ही दुकाने सदर बाजार पोलीस हद्दीत असल्याने सिंह यांनी तत्काळ सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांना घटनास्थळी बोलावून संबंधितांविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिले. उत्सव काळात अशा प्रकारे दुकाने उघडी राहू नये यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश सिंह यानी यावेळी दिले.(प्रतिनिधी)
कोम्बींग आॅपरेशनमध्ये ५ संशयित,२ दुकानदारांवर कारवाई
By admin | Updated: April 14, 2017 00:58 IST