बाळासाहेब जाधव ,लातूर
ग्रामीण भागातील ३ ते ६ वयोगटातील मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यावीत यासाठी लातूर जिल्ह्यातील २४०८ अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत़ यापैकी ४५० अंगणवाड्यांना इमारतीच नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घ्यावे लागत आहे़ सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने या चिमुकल्यांना अनंत आडचणीला सामोरे जावे लागत आहे़ लातूर जिल्ह्यातील ३ ते ६ वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणावे या दृष्टीकोनातून २४०८ अंगणवाड्यांना टप्याटप्याने मान्यता देण्यात आली आहे. या अंगणवाड्या सुरू आल्या आहेत़ यामध्ये उदगीर तालुक्यात २६५ मिनी अंगणवाड्या, निलंगा १ - २२७, निलंगा २ - १६५, अहमदपूर २४८, औसा १ - १९८, औसा २ - १५१, लातूर १ - २०६, लातूर २ - १५१, रेणापूर १९२, चाकूर २४२, देवणी १३५, जळकोट ११६, शिरुर अनंतपाळ ११२ अशा एकूण २४०८ अंगणवाड्या आहेत़ यापैकी १९५८ अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत आहेत़ तर ४५० अंगणवाड्यांना अद्यापही इमारतीच नसल्याने या अंगणवाड्या अंतर्गत येणाऱ्या चिमुकल्यांना उघड्यावरच शिक्षण घ्यावे लागत आहे़ २०१४-१५ मध्ये १४३ अंगणवाड्यासाठी ५ कोटी ५० लाखांचा निधी आला आहे़ त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत़ २०१५-१६ मध्ये ५ कोटी ५२ लाख रुपये अंगणवाडी इमारतीच्या बांधकामासाठी मंजूर झाले असून, १०२ अंगणवाडीचे कामे हाती घेतले आहेत़ ग्रामपंचायतीच्या सहकार्यानेच अंगणवाड्यांना जागा उपलब्ध होत असल्याने गावकऱ्यांचे सहकार्य असणे आवश्यक आहे़ परंतु या अंगणवाड्यांना ग्रामपंचायतीने जागाच उपलब्ध करुन दिली नसल्याने ४५० अंगणवाड्या उघड्यावरच भरवाव्या लागत आहेत़ सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे़ अशा पावसामध्ये चिमुकल्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ग्रामपंचायतीला पत्र देऊन जागेची उपलब्धता करुन त्या-त्या अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम केले जाते़ परंतु काही अंगणवाड्यांना ग्रामपंचायतीकडून जागाच उपलब्ध होत नसल्याने त्या-त्या गावातील अंगणवाडीच्या इमारतीची कामे रखडली आहेत़ जागेची अडचण़़़ लातूर जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्यापैकी महिला व बालकल्याण विभागाकडून ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करुन देताच अंगणवाड्यांच्या इमारती उभारणीचे काम सुरु केले आहे़ परंतु काही गावांत जागाच उपलब्ध करुन दिली जात नसल्याने १६० अंगणवाड्यांच्या इमारत उभारणीसाठी जागेची अडचण निर्माण झाली आहे़ अपुऱ्या सुविधा... लातूर जिल्ह्यातील २४०८ अंगणवाड्यांची निर्मिती झाली आहे. परंतु, यातील बहुतांश अंगणवाड्यांना अद्यापही पुरेशा सुविधा मिळाल्या नसल्याने अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही अंगणवाड्यांना इमारती नाहीत. तर काही अंगणवाड्यांना स्वच्छतागृह नाही. परिणामी, चिमुकल्यांना उघड्यावरच शिक्षण घ्यावे लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष देऊन जिल्ह्यातील अंगणवाड्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे. लातूर जिल्ह्यातील ४५० अंगणवाड्या इमारतींअभावी उघड्यावर भरत असल्यामुळे चिमुकल्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. शाळा सुरू असताना वादळी वारे, पाऊस आल्यास चिमुकल्यांनी जायचे कोठे? असा सवालही उपस्थित होत आहे. ४काही गावांत लोकप्रतिनिधींच्या गटबाजीमुळे अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी जागा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळेही चिमुकले शिक्षणापासून वंचित राहत आहेत.