लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या तब्बल ४४ नागरी सहकारी पतसंस्थांकडे जिल्हा बँकेचे ७८ लाख १४ हजार ६५५ रुपये कर्ज थकीत आहेत. जिल्हा बँक प्रशासन कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करीत होते. मात्र पदाधिकाऱ्यांसह संचालक प्रतिसाद देत नसल्याने डीसीसीने आता कारवाई मोहीम हाती घेतली आहे़ संबंधित संस्था पदाधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीचा शोध घेऊन त्या प्रॉपर्टीवरच बोजा चढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.जिल्हा बँक आर्थिक अडचणीत येण्यास अनेक कारणे आहेत़ यात कर्ज घेऊन थकीत राहिलेल्या बिगर शेतीच्या संस्थांचा वाटा मोठा असल्याचे दिसते़ एकूण १६ प्रकारच्या संस्थांकडे तब्बल १९४ कोटी ३७ लाख ५३ हजार ८५७ रुपयांचे कर्ज थकीत आहे़ यात पगारदार कर्मचाऱ्यांच्या २५ पतसंस्थांकडे ४ कोटी ८८ लाख १४ हजार ५२९ रुपयांचे कर्ज थकीत आहे़ जिल्ह्यातील ४४ नागरी सहकारी पतसंस्थांकडे ७८ लाख १४ हजार ६५५ रुपयांची थकबाकी आहे़ जवळपास सहा लाख ठेवीदारांच्या ४४० कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत आहेत़ कुणाच्या मुला-मुलीचे लग्न, कुणाचा दवाखाना तर कुणाचे काही काम आर्थिक अडचणींमुळे थांबत आहे़ जिल्हा बँकेत ठेवी असतानाही त्या मिळत नसल्याने दररोज शेकडो ठेवीदार बँकेत चकरा मारत आहेत़ बँकेला गत वैैभव मिळवून देण्यासाठी व ठेवीदारांचा विश्वास जपण्यासाठी आता बँकेने कारवाई मोहीम हाती घेतली आहे़ न्यायालयीन प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्यासाठीही पावले उचलली जात आहेत़ जिल्ह्यातील ४४ नागरी सहकारी पतसंस्थांकडील जवळपास ८० लाख रुपये वसूल करण्यासाठीही बँकेने कायदेशीर नोटीसांसह इतर प्रक्रिया जवळपास पूर्ण केली आहे़ थकबाकीदार संस्थांमध्ये उस्मानाबादेतील माऊली सहकारी पसतंस्था, पवन नागरी पतसंस्था, महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था, मुस्लिम नागरी सहकारी पतसंस्था, ढोकी येथील किसन ता़ समुद्रे पतसंस्था, ढोकी येथीलच डॉ़ पद्मसिंह पाटील पतसंस्था, ढोकी येथीलच कृष्णा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, संत श्री माऊली पतसंस्था- येडशी, गा़बिगर शेती पतसंस्था-ढोकी, डॉ़ आंबेडकर पतसंस्था- ढोकी, डॉ़ पद्मश्री ना़सह़पतसंस्था- बेंबळी, गजानन ना़ सह़पतसंस्था- बेंबळी, श्री जीवनराव गोरे पतसंस्था- बेंबळी, तुळजापूर शहरातील नळदुर्ग पतसंस्था, महाराष्ट्र पतसंस्था- उमरगा, छत्रपती शिवाजी पतसंस्था- उमरगा, प्रियदर्शनी पतसंस्था उमरगा, जयश्री महिला पतसंस्था उमरगा, छ़ शाहू मा़व़पतसंस्था- उमरगा, अभय पतसंस्था- उमरगा, धनवर्षा गा़ बि़शे़सह़पतसंस्था - माडज, हुतात्मा वेदप्रकाश पतसंस्था- गुंजोटी, शिवप्रताप पतसंस्था- कुन्हाळी (कर्ज घेतलेली शाखा मुळज), कळंब विकास पतसंस्था-कळंब (मुळज), लोकमान्य जयप्रकाश ना़ नागरी सह़पतसंस्था कळंब (मुळज), प्रियदर्शनी पतसंस्था- कळंब, पवनराजे पतसंस्था- शिराढोण, संतसेना पतसंस्था- शिराढोण, चिंतामणी पतसंस्था- खामसवाडी, शिवशक्ती पतसंस्था- तांदूळवाडी, राजनाथ पतसंस्था माणकेश्वर, जोगेश्वरी पतसंस्था- सोनारी, शिवशक्ती पतसंस्था- वाशी, बालाजी पतसंस्था- वाशी, समर्थ पतसंस्था- भूम, भूम पतसंस्था- भूम, दत्त पतसंस्था- सुकटा (भूम), जयभवानी पतसंस्था-भूम, चौंडेश्वरी पतसंस्था-भूम, सिध्दीविनायक पतसंस्था-भूम, भूम ता़ सर्वधर्म समभाव पतसंस्था-भूम, विकास ग्रा़बि़शेती पतसंस्था-भूम व इतर संस्थांचा यामध्ये समावेश आहे़ संबंधित संचालक मंडळांकडून कर्ज वसुलीस प्रतिसाद मिळत नसल्याने बँकेने आता कर्ज घेतेवेळी जे संचालक मंडळ होते त्या सर्वांच्या प्रॉपर्टीचा कायदेशीर शोध सुरू केला आहे़ कागदपत्रे मिळताच संबंधितांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढविण्याची प्रक्रिया होणार आहे़
४४ पतसंस्था संचालकांच्या ‘प्रॉपर्टी’वर चढणार बोजा
By admin | Updated: May 8, 2017 23:38 IST