औरंगाबाद : मागील एक वर्षात स्मार्ट सिटी अंतर्गत एकूण ४३८ कोटींचे प्रकल्प पूर्ण करण्यात यश मिळाले आहे, असे प्रतिपादन महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी येथे केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेने राबविलेल्या विविध प्रकल्पांची माहिती प्रशासकांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमार्फत मुख्यमंत्र्यांना दिली. जानेवारी २०२०मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत केवळ तीन प्रकल्प पूर्ण होते, जानेवारी २०२१पर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत एकूण ४३८ कोटींचे प्रकल्प पूर्ण करण्यात आले.
शहरातील तीन कचरा प्रक्रिया प्रकल्प पाडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी हे कार्यान्वित झाले असून, चौथे हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्राचे काम येत्या चार महिन्यात पूर्ण होईल. हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यावर शहर कचरामुक्त होणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.
याशिवाय प्रशासकांनी १५२ कोटींचे रस्ते, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन, क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे, पाणी पुरवठा योजना, स्मार्ट शहर बस, बसथांबे, बस डेपो, ई-गव्हर्नन्स, ऐतिहासिक दरवाजे, दमडी महल, नहर-ए-अंबरी आणि शहागंज घडीचे संवर्धन आणि सौंदर्यीकरण या विषयांवर माहिती दिली.
आकृतीबंधसाठी प्रशासकांची शिफारस
महापालिकेच्या आकृतीबंध प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता द्यावी, अशी विनंती प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रत्येकाला त्यांचे प्राधान्य क्रमांकानुसार शासन मान्यतेसाठी विषय विचारले. यावेळी प्रशासकांनी महापालिकेत कर्मचारी भरतीसाठी शासनाला पाठविण्यात आलेल्या आकृतीबंधचा प्रस्ताव शासनाने प्राधान्याने मंजूर करावा, असे सांगितले.