औरंगाबाद : जागतिक महिला दिनानानिमित्त जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ४२ आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, कार्यकर्ती व मदतनीस यांचा सोमवारी सन्मान करण्यात आला.
जि. प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महिला व बाल कल्याण विभागातर्फे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या ग्रामीण १४ प्रकल्पांमधील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यावेळी उपस्थित होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी ऑनलाईन उपस्थिती लावून महिलांना शुभेच्छा देत पुरस्कार्थींचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले.