शिरीष शिंदे, बीडपरदेशात जाण्यासाठी लागणारे पासपोर्ट मिळविणे म्हणजे एका प्रकारची परीक्षाच बनली आहे. त्यात प्रक्रिया पूर्ण होऊन पासपोर्ट न मिळणे हा तर तोंडात घातला जाणारा घास थांबविल्यासारखी स्थिती. असाच काहीसा प्रकार बीडकरासंदर्भात घडत आहे. बीड येथील पासपोर्ट विभागाने मुंबई पासपोर्ट आॅफिसला जिल्ह्यातील ४०० जणांचा क्लिअरन्स रिपोर्ट दिला मात्र लोकांना पासपोर्टची प्रतीक्षा पहावी लागत आहे. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून पूर्वी पासपोर्टसाठी अर्ज करावा लागत होता. संपूर्ण तपासणी व पोलिसी प्रक्रिया झाल्यानंतर पासपोर्ट वितरीत केला जायचा़ मात्र जानेवारी २०१३ पासून मुंबई येथील पासपोर्ट कार्यालयाद्वारे पासपोर्ट वितरीत करण्यास सुरुवात झाली. यामुळे अनेकांना इच्छा नसतानाही मुंबई येथे जावे लागते आहे. यामुळे पैसा व वेळ वाया जात आहे़ पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट झाली असल्याने अनेकजण समोर येईना झालेत. दरम्यान, बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातून गेल्या दोन महिन्यांपूर्वी जवळपाच चारशे जणांचे रिपोर्ट पासपोर्टसाठी दिले गेले होते, मात्र अद्यापही त्यांचे पासपोर्ट त्यांना मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे अनेकांची स्वप्ने पासपोर्टसह हवेतच अडकली आहेत. अनेक नागरिक परदेशात फिरायला किंवा इतर कामानिमित्त जाण्यासाठी पासपोर्टसाठी अप्लाय करतात. मात्र त्यांना पासपोर्ट मिळत नसल्याने त्याची वाट पहावी लागत आहे. परिणामी, अनेकांची कामे पासपोर्टअभावी अडकून पडली आहेत. अनेकांनी पासपोर्ट मिळाला नसल्याची चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळली नाहीत. पासपोर्टची क्लिष्ट प्रक्रियापासपोर्ट पाहिजे असणाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या आॅफिशिअल वेबपोर्टलवर जाऊन आॅनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो, त्यासाठी दीड हजार रुपये भरावे लागतात. त्यानंतर मुंबई पासपोर्ट आॅफिसची अपॉर्इंटमेंट घ्यावी लागते. तेथे जाऊन सर्व कागदपत्रे स्कॅन करुन घेतली जातात. सदरील व्यक्तीची फाईल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पासपोर्ट विभागास ई-प्रणालीद्वारे प्राप्त होतो. व्हेरिफीकेशन पूर्ण झाल्यानंतर माहितीची फाईल पुन्हा ई-प्रक्रियेद्वारे मुंबईच्या पासपोर्ट कार्यालयास पाठवली जाते. त्यानंतर जवळपास पंधरा दिवसानंतर पासपोर्ट घरच्या पत्त्यावर पोहोच होतो. पासपोर्टसाठी अप्लाय करणाऱ्यांची संख्या वाढलीजानेवारी २०१३ पासून पासपोर्ट मुंबई येथून इश्यु करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई येथे जाऊन पासपोर्टसाठी अप्लाय करणे अनेकांना कठीण वाटत असल्याने त्यांनी फाईल करणे टाळले. जानेवारी ते डिसेंबर २०१३ या कालावधीत २१०० लोकांनी पासपोर्टसाठी अप्लाय केले तर जानेवारी ते जुलै २०१४ या सात महिन्यांच्या कालावधीत १५०० लोकांनी पासपोर्टसाठी अप्लाय केले आहे. पर्याय नसल्याने आता नागरिक पासपोर्टसाठी पुढे आले आहेत. अप्लाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.कोऱ्या पासपोर्टचे शॉर्टेज ?केंद्र सरकारच्या ‘द इंडिया सेक्युरिटी प्रेस नाशिक’ येथून पोस्टेज स्टॅम्प, नोटा, कोरे पासपोर्ट छापले जातात. देशामध्ये केवळ याच ठिकाणी याची छपाई होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील द इंडिया सेक्युरिटी प्रेस येथे काही कारणांमुळे एकूण छपाईच्या अर्ध्या प्रमाणत कोऱ्या पासपोर्टची छपाई केली जात असल्याने पासपोर्टचे शॉर्टेज झाले आहे.
४०० जणांची हवाई सफर थांबली
By admin | Updated: July 17, 2014 00:59 IST