औरंगाबाद : केंद्र सरकारच्या नवीन अध्यादेशानुसार वाढीव बोनसचा लाभ मिळाल्याने सुमारे चार लाख औद्योगिक कामगारांच्या खिशात पैसा खुळखुळत आहे. बोनसचे २०० ते ४०० कोटी रुपये बाजारात येत आहेत. तुरळक अपवाद वगळता कामगारांना ७ हजार ते ४० हजार रुपयांपर्यंत बोनसचे वाटप करण्यात आले. औरंगाबादेतील वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, पैठण, रेल्वेस्टेशन या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना बोनस वाटपास सुरुवात झाली आहे. ‘सिटू’च्या संघटना असणाऱ्या कंपन्यांत बोनस वाटपाचे कामकाज जवळपास पूर्ण झाल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष उद्धव भवलकर, सरचिटणीस लक्ष्मण साक्रुडकर यांनी दिली. औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे चार लाख कामगार कार्यरत आहेत. यापैकी १ लाख कामगार कायमस्वरुपी, तर ३ लाख कामगार कंत्राटी आहेत. २०१५-१६ या वर्षाचा बोनस नवीन कायद्यानुसार देणे बंधनकारक आहे. यामुळे कामगारांच्या खिशात किमान ७ हजार रुपयांचा बोनस पडला आहे. तुरळक कंपन्यांत व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात वाद सुरू आहेत. हे वाद समन्वयाने मिटवून जास्तीत जास्त कंत्राटी कामगारांना बोनसचा लाभ दिला जावा, अशी अपेक्षा भवलकर यांनी व्यक्त केली.मद्यनिर्मिती क्षेत्रातील युनायटेड ब्रेवरिज या कंपनीने आपल्या कामगारांना ४० हजार रुपयांचा बोनस दिला आहे. त्याखालोखाल टायर निर्मिती करणाऱ्या गुडईअर कंपनीने ३९ हजार रुपये, कोल्हर कंपनीने १२ ते २२ हजार रुपये, इंडियन टूलने १६,८०० ते २२ हजार रुपयांचा बोनस दिला. ४महाराष्ट्र कामगार विकास संघटना कार्यरत असणाऱ्या कंपन्यांतही बोनसचे वाटप करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक सचिव रामकिसन शेळके यांनी दिली.४ आमुलेट कोटिंग लिमिटेड, इंटरनॅशनल कंम्बरशन लिमिटेड, औरंगाबाद आॅटो लिमिटेड, एस. एन. मेटोलॉजी, बागला ग्रुप यांनी प्रत्येकी १६, ८०० रुपये, तर वर्षा फोर्जिंगने १७,५०० रुपये, इप्का लॅबोरेटरीजने २१,५०० रुपये, विप्रो लायटिंगने १७,५००, हिंदुस्थान कम्पोजिटने २१,५०० रुपयांचा बोनस दिल्याची माहिती शेळके यांनी दिली.
४०० कोटी बाजारात
By admin | Updated: October 26, 2016 00:59 IST