परळी : प्रतिष्ठेच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालकपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी ३६ जणांनी तलवारी म्यान केल्या. २० जागांसाठी ४० उमेदवार नशीब आजमावत असून पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पॅनलमध्ये ‘स्ट्रेट फाईट’ होत आहे.वैद्यनाथ साखर कारखान्यावर सत्ता अबाधित ठेवण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे, अॅड. यशश्री मुंडे या बहिणी स्वत: निवडणूक लढवित आहेत. दुसरीकडे कारखान्यात सत्तापालट करण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पंडितराव मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पिता-पुत्र सरसावले आहेत. २६ एप्रिल रोजी होत असलेल्या या निवडणुकीत २१ जागांसाठी १२१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, छाणणीत पंडितराव मुंडे, धनंजय मुंंडे यांच्यासह २१ जणांचे अर्ज बाद ठरले. सहकारी संस्था या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पंडितराव मुंडे व भाजपाच्या वतीने नामदेवराव आघाव यांची उमेदवारी होती; परंतु दोघांचेही अर्ज अवैध ठरले. त्यामुळे २० जागांसाठीच प्रक्रिया होत आहे. मंगळवारपर्यंत १०० पैकी २४ जणांनी माघार घेतली होती. शेवटच्या दिवशी ३६ जणांनी नामनिर्देशनपत्र काढून घेतले. त्यामुळे २० जागांसाठी ४० जण आमने- सामने आहेत. एकास एक उमेदवार असल्याने चुरस वाढली आहे. दरम्यान, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे नाव पॅनलला दिले आहे. धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे नाव वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनल आहे. भाजपाने अनुभवी व तज्ज्ञ सभासदांना संचालकपदासाठी उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादीने भाजपाच्या तीन शिलेदारांना आपल्या तंबूत खेचले आहे. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. कारखाना निवडणुकीला पहिल्यांदाच इतके मोठे स्वरुप आले आहे. प्रचारसभेत आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीही झडणार आहेत. (वार्ताहर)
२० जागांसाठी ४० जणांत ‘फाईट’
By admin | Updated: April 16, 2015 01:00 IST