कंधार: निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने लावलेले पांढरे सोने पावसाअभावी कोमेजून गेले आहे. यामुळे चार हजार एकर पांढऱ्या सोन्याची पेरणीपूर्व मशागत, बियाणे व मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी फिरले असून सुमारे ११ कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसला असल्याचे विदारक चित्र आहे.खरीप हंगामाची पेरणी मागीलवर्षी जून अखेर संपत आली होती. ६१ हजार ५०० हेक्टरच्या खरीप हंगामाची रिमझीम व संततधार पावसाने मोठी नासाडी केली. परंतु सरासरी ८३३ मि. मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने जलसाठा मुबलक वाढला. रबी हंगामाची लागवड उत्साहाने शेतकऱ्यांनी केली. गारपीटीचा तडाखा जवळपास ६० पेक्षा जास्त गावांना बसला. पिकात गारांचे ढीग साचले. पीके आडवी पडून स्वप्नभंग झाला. एवढे मोठे संकट गिळून २०१४ च्या खरीप हंगाम लागवडीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले. रासायनिक खते व बी-बियाणाची खरेदी करण्यात आली. हलक्या पावसावर व उपलब्ध जलसाठ्यावर १६०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड शेतकऱ्यांनी केली.खरीप हंगामातील सर्व क्षेत्रावर पेरणीपूर्व मशागती, धसकट वेचणी, नांगरटी आदी कामे करण्यात आली. हलक्या पावसाच्या सरीवर शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पेरणी करण्याचे धाडस केले. एकरी नांगरटीचा खर्च १ हजार ते १२०० रुपये आहे. बियाणाचा भाव व खरेदीचा प्रवास असे एक हजार रुपये व एकरी पाच क्विंटल उत्पन्न आणि प्रति क्विंटल ४ हजार ५०० ते ५ हजाराचा भाव असे एकूण मजुरी वगळता २७ हजार होतात. ४ हजार एकर कापसाला निसर्गाने हुलकावणी दिली आहे. कडक तापमान वाढले आहे. पावसाची हजेरी नाही. यात उन्हाळा सदृश्य वातावरणाने कापूस कोमेजला असून उगवण झाली नाही.(वार्ताहर)
४ हजार एकर पांढरे सोने कोमेजले, शेतकऱ्यांत चिंता
By admin | Updated: July 4, 2014 00:20 IST