उस्मानाबाद : बारा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या गुरूजींना चटोपाध्याय वेतनश्रेणी देणे बंधनकारक असते. असे असतानाही वेतनश्रेणीसाठी पात्र असणाऱ्या ३६९ गुरूजींची संचिका मागील नऊ महिन्यांपासून प्रलंबित होती. अखेर हा प्रश्न मार्गी लागला असून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षकांना २० डिसेंबर रोजी आदेश निर्गमित केले आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळांवर कार्यरत असलेल्या सुमारे पाचशेवर शिक्षकांनी बारा वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर संबंधितांनी प्राथमिक शिक्षण विभागाकडे चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. प्रस्ताव प्राप्त होताच त्यांना वेतनश्रेणी देणे अपेक्षित असते. परंतु, तसे झाले नाही. कारण प्रस्ताव दाखल केलेल्यांपैकी काही गुरूजींचे गोपनीय अहवाल कार्यालयातून गहाळ झाले होते. याची शोधाशोध केल्यानंतरही सर्व अहवाल सापडलेले नाहीत. त्यामुळे आता करायचे काय? असा प्रश्न शिक्षण खात्यासमोर निर्माण झाला होता. परिणामी मागील आठ ते नऊ महिन्यांपासून चटोपाध्याय वेतनश्रेणीची संचिका लटकली होती.दरम्यान, वेतनश्रेणीचा प्रश्न निकाली निघत नसल्याने संबंधित गुरूजींकडून वारंवार पाठपुरवा केला जात होता. तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने कल्याण बेताळे यांनीही शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.त्याचप्रमाणे अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, शिक्षण सभापती सुधाकर गुंड यांच्याकडेही व्यथा मांडली होती. तरीही संचिका निकाली निघण्यास विलंब होत होता. त्यावर आठ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’ने ‘१३७ गुरूजींच्या गोपनीय अहवालाचा शोध लागेना’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत शिक्षण विभागाने या प्रक्रियेला गती दिली. पात्र शिक्षकांच्या प्रस्तावांची तपासणी करून ज्यांचे गोपनीय अहवाल उपलब्ध आहेत, अशा ३६९ शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी देण्यात आली. याबाबतचे आदेश शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव यांनी २० डिसेंबर रोजी निर्गमित केले आहेत. ४बारा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या जिल्हा परिषद शाळेवरील सुमारे ३६९ गुरूजींना नऊ महिन्यानंतर का होईना वेतनश्रेणी मिळाली आहे. परंतु, आणखी १३६ गुरूजींना वेतनश्रेणी देणे बाकी आहे. कारण यापैकी काही प्रस्तावांमध्ये त्रुटी आहेत. तर काही प्रस्तावधारकांचे गोपनीय अहवाल मिळालेले नाहीत. त्यामुळे संबंधित गुरूजींच्या चटोपाध्याय वेतनश्रेणीचा प्रश्न अद्यापि लटकलेला आहे.४चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी पात्र ठरलेल्या ३६९ शिक्षकांचे आदेश तालुकास्तरावर पाठविण्यात आले आहेत. उर्वरित शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
३६९ गुरुजींना वेतनश्रेणी !
By admin | Updated: December 22, 2014 01:00 IST