लातूर : लातूर शहरात आणि शहरालगत लहान-मोठे जवळपास ७९२२ चहाचे हॉटेल्स आहेत़ यातील ९० टक्के चहाच्या हॉटेल्समधून नित्य नियमाने दररोज चहाचा पहिला कप आणि एक ग्लास पाणी रस्त्यावर टाकले जाते़ दिवसभरात धंद्यात बरकती वाढावी म्हणून भोळीभाबडी श्रद्धा हॉटेल चालकांकडून व्यवसाय टाकल्यापासून सुरू आहे़ यातून जवळपास दररोज ३४ हजार ५० रुपयांचा चहा रस्त्यावर पडतो़ पैसे नसलेल्या एखाद्या गरीबाला एक कप चहा पाजायचे सौजन्य दाखविले जात नाही़ मात्र रस्त्यावर चहा टाकण्याची ही परंपरा आधुनिक युगातही सुरू आहे़ ‘लोकमत’च्या चमूने गेली पाच दिवस सकाळच्या पहारी शहरातील चहाच्या टपऱ्यांवरचे निरिक्षण केले असता ही स्थिती समोर आली आहे़ जवळपास ६८१० ठिकाणी रस्त्यावर चहा टाकण्याचे दृश्य दिसले़लातूर शहरातील पी़व्ही़आर चौक ते नांदेड नाका या मुख्य रस्त्यांवर लहान मोठी ३५० हॉटेल्स आहेत़ रेणापूर नाका ते औसा रोडवरील रिंग रोड पर्यंत ३७० हॉटेल्स आहेत़ मिनीमार्केट ते मोतीनगर परिसरात ३५ चहाच्या टपऱ्या आहेत़ दयानंद गेट ते खाडगांव रोड परिसरात १२५ चहाची दुकाने आहेत़ शहराअंतर्गत आणि शहरालगतच्या वस्त्यांमध्ये ७ हजार ४२ चहाची हॉटेल्स आहेत़ यातील ९० टक्के हॉटेल्समधून चहाचा पहिला कप आणि एक ग्लास पाणी रस्त्यावर टाकले जाते़ केवळ दिवसभरात आपला धंदा चांगला व्हावा, ही भावना त्या पाठीमागे आहे़ पहिल्या चहाची चव न चाखता नित्य नियमाने रस्त्यावर टाकून व्यवसायाच्या बरकतीसाठी साकडे घातले जाते़ ‘लोकमत’ने रविवार ते गुरूवार असे पाच दिवस सकाळच्या रामपारी हॉटेल्स मधील धावपळीचे निरिक्षण केले असता ही बाब निदर्शनास आली़ दरम्यान, पीव्हीआर चौकात दोन्हीही बाजूंनी ६० हॉटल्सच्या टपऱ्या आहेत़ या सर्व टपऱ्यांमधून सकाळच्या पहारी पहिला चहा रस्त्याला पाजण्यात आला़ दरम्यान, काही हॉटेल चालकांना याबाबत विचारले असता काहींना पहिला चहा रस्त्यावर टाकण्याची सवयच लागल्याची सांगितले़ तर दिवसभर चांगला व्यवसाय व्हावा म्हणून पहिला चहा देवाला पाजतो, असे सांगितले़
रस्त्यावर ३४ हजार ५० रुपयांचा चहा!
By admin | Updated: October 14, 2016 00:20 IST