औरंगाबाद : गोरगरिबांपासून सर्वांनाच कमी किमतीत मात्र, गुणवत्तापूर्ण औषधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने जन औषधी उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत शहरात पहिले ‘जन औषधी स्टोअर’ सुरू झाले आहे. याठिकाणी चारशेपेक्षा अधिक औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सरासरी बाजारात ३३ रुपयांत मिळणाऱ्या १० गोळ्यांसाठी याठिकाणी अवघे ४ रुपये मोजावे लागणार आहेत.बाबा पेट्रोलपंपाजवळील म्हाडा शॉपिंग येथे हे स्टोअर सुरू करण्यात आले आहे. या स्टोअरविषयी शेखर पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शासन अंगीकृत औषधनिर्मिती प्रकल्प, तसेच काही खाजगी उद्योगांकडून औषधी खरेदी करीत असल्याने ती अतिशय स्वस्तात उपलब्ध करून देता येत आहे. जाहिरात, वितरण इ.वरील खर्चाचीही कपात होत असल्याने जेनेरिक औषधी अतिशय कमी किमतीत मिळत आहे. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, गॅस्ट्रो, जीवनसत्त्व, अँटीबायोटिक्ससह ४०० हून अधिक औषधी येथे उपलब्ध आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली. शासकीय व निमशासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांनी जेनेरिक औषधीच लिहून द्यावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाय रुग्णांनीदेखील जेनेरिक औषधी लिहून घेतली पाहिजेत, असेही ते म्हणाले.