सखाराम शिंदे, गेवराई गोदावरी नदीला महापूर आल्यास गोदकाठच्या अनेक गावांना पाण्याचा विळखा पडतो. यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे पुनर्वसन रखडले आहे. आता पावसाळा तोंडावर येताच पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवनपासून तलवाड्यापर्यंतची अनेक गावे गोदावरीच्या काठी वसलेली आहेत. २००६ व २००७ मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पैठण येथील नाथसागरही तुडुंब भरले होते. त्यावेळी गोदावरी नदीपत्रात पाणी सोडण्यात आले होते. धरणातून सोडलेले पाणी व पडत्या पावसामुळे गेवराई तालुक्यातील रामपुरी, बोरगाव, भोगलगाव, कुरणींिपंप्री, पांचाळेश्वर, सावळेश्वर, राहेरी, राजापूर, राक्षसभुवन, आगरनांदुर अशा अनेक गावांना पुराचा वेढा पडला होता. नदीला आलेला पूर व गावांना पडलेला पुराचा वेढा यामुळे अनेकांना गाव सोडून स्थलांतर करावे लागले. पुराच्या पाण्यामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. तसेच शेतातील पिकेही वाहून गेली. यामुळे ग्रामस्थांवर आसमानी संकट ओढावले होते. यामुळे अनेक गावेच्या गावे स्थलांतरीत करण्यात आली होती. या नैसर्गिक आपत्तीकाळात आपद्ग्रस्तांना आमदार, मंत्री तसेच तालुका व जिल्हा प्रशासनाने भेटी दिल्या होत्या. यावेळी आपद्ग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याच्या घोषणाही करण्यात आल्या होत्या. या पुनर्वसनाच्या घोषणेला आता आठ वर्षे लोटली तरीही अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. गोदावरीला पूर आला की, या परिसरातील ग्रामस्थांच्या समस्यांमध्ये वाढ होते. पुनर्वसन होत नसल्याने ग्रामस्थांच्या जिवाला धोका कायमच आहे. मात्र याची ना महसूल प्रशासन दखल घेते ना लोकप्रतिनिधींना चिंता वाटते. पुनर्वसनासाठी २००९ मध्ये ३२ गावांचे पंचनामे करून प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. यावरही अद्याप काहीच कारवाई न झाल्याने गोदाकाठच्या नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके म्हणाले, ३२ गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून पाठपुरावा सुरू आहे.
३२ गावांचे पुनर्वसन रखडले
By admin | Updated: May 20, 2014 01:09 IST