वडवणी: वडवणी तालुक्यात आजही ग्रामीण भागात योग्य त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अंत्यविधीसाठीही स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने अनेकांना उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. याकडे मात्र प्रशासनाचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.वडवणी तालुक्याची निर्मिती होऊन एक तप उलटून गेले. एवढा कालावधी उलटूनही तालुक्यामध्ये योग्य त्या सोयी-सुविधा नाहीत. वडवणी तालुक्यामध्ये एकूण ३६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर गाव, तांडे, वाडी, वस्त्या यांची संख्या ४८ आहे. एवढी मोठी संख्या असूनही केवळ ८ गावांमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी उपलब्ध आहे. बाकी गावांमध्ये मात्र अंत्यसंस्कारासाठी नदी, ओढे, गायरान, पडीक जमीन, मोकळे मैदान यांचा आधार घ्यावा लागत आहे.माणूस जन्मल्यापासून मरणापर्यंत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्याला नरक यातना भोगाव्या लागत आहेत. जिवंतपणी योग्य सोयी सुविधा मिळत नाहीत तर मरणानंतरही अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने अनेक गावातील नागरिकांना उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. तालुक्यातील कुप्पा, कवडगाव, उपळी, चिंचवडगाव, हरिश्चंद्र पिंप्री, देवडी या गावांमध्ये स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. मात्र या उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीचीही दुरवस्था झाली आहे. ग्रामपंचायतला मात्र याची डागडुजी करण्यास मुहूर्त मिळत नसल्याचा आरोपही ग्रामीण भागातील ग्रामस्थांमधून केला जात आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. स्मशानभूमी उभारण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.याबाबत विस्तार अधिकारी राऊत म्हणाले, प्रत्येक ग्रामपंचायतीने पंचायत समितीमध्ये प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे. ग्रा.पं.कडून प्रस्ताव आले की, वरिष्ठ विभागातून आम्ही निधी उपलब्ध करुन देऊ. त्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. (वार्ताहर)उघड्यावरच करावे लागतात अंत्यसंस्कार प्रशासनाचे दुर्लक्षनदी, गायरान या जागांचा घ्यावा लागतो अंत्यसंस्कारासाठी आधारनिवारा शेड नसल्याने पावसाळ्यात होतात हालग्रा.पं.चीही स्मशानभूमीचे प्रस्ताव पाठविण्यास उदासिनताकेवळ ८ गावातील स्मशानभूमीचीही झाली मोठी दुरवस्था
३१ गावांना आजही स्मशानभूमीच नाही !
By admin | Updated: July 28, 2014 00:53 IST