औरंगाबाद : शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी मनपाने खाजगी कंपन्यांची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. मनपाच्या निविदा प्रक्रियेला ३ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. लवकरच या निविदा उघडून प्रशासन पुढील कारवाई करणार आहे. मनपाच्या दप्तरी १ लाख ९७ हजार मालमत्तांची नोंद आहे. वीज कंपनीकडे मीटरची संख्या अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. अनेक मालमत्ताधारकांनी जुनी घरे पाडून टोलेजंग इमारती उभ्या केल्या. मात्र त्यांना आजही जुन्या घराप्रमाणे कर लावण्यात येत आहे. त्यामुळे मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. मनपा प्रशासनाने जीएसआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वेक्षण करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. गेल्या महिन्यात प्री-बीडमध्ये अनेक कंपन्यांनी सहभागही नोंदविला. मात्र प्रत्यक्षात एकाच संस्थेने निविदा दाखल केली. त्यामुळे दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. त्यानंतर दोन संस्थांनी निविदा दाखल केली. नियमानुसार किमान ३ निविदा येणे आवश्यक असल्याने आता तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार निविदा भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३ कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. या निविदांचे टेक्निकल बीड उघडण्यात आले असून, फायनान्शियल बीड लवकरच उघडण्यात येणार आहे.
मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी ३ निविदा
By admin | Updated: June 29, 2016 01:00 IST