हिंगोली : जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ३ कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांच्या वतीने ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ घोषित करण्यात आले आहे. या पदकाबद्दल पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी तिन्ही कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा विशेष सत्कार केला. नक्षलग्रस्त भागात सुरक्षेची जबाबदारी पार पाडून सेवा केल्याबद्दल हे पदक महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने देण्यात येते. कळमनुरी ठाण्यात पोलीस नायक पदावर कार्यरत असलेले संजय लक्ष्मणराव मारके, हिंगोली शहर ठाण्यातील पोना कोंडबा मुकींदा मगरे आणि बिनतारी संदेश विभागातील सहायक पोलीस उपनिरीक्षक उदयसिंग विरेंद्रसिंग राजपुत यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक घोषित झाले आहे. हिंगोली येथील रहिवासी असलेले संजय मारके यांनी गडचिरोली जिल्ह्यात १९९३ ते २००५ या काळात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम केले आहे. त्यांना १९९८ साली विशेष सेवा पदकाने गौरविण्यात आले. तसेच मोरगव्हाण (ता. कळमनुरी) येथील रहिवासी असलेले कोंडबा मगरे यांनीही गडचिरोली जिल्ह्यात १९९८ ते २०१० या कालावधीत काम केले असून त्यांना २००८ मध्ये विशेष सेवा पदकाने गौरविण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी उदयसिंग राजपुत यांना नक्षली भागातील सुरक्षा कार्याबद्दल २००२ मध्ये विशेष सेवा पदक मिळाले. हिंगोली येथे पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी सपोउपनि राजपुत, पोना मारके, मगरे यांचा या पदकांबद्दल सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्र दिले. या कार्यक्रमास फौजदार राठोड, लेखनिक वडजे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
३ पोलिसांना सेवा पदक घोषित
By admin | Updated: July 4, 2014 00:21 IST