औरंगाबाद : महावितरणच्या दिरंगाईमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पैसे भरूनही कृषी पंपांसाठी वेळेत वीज कनेक्शन मिळणे कठीण झाले आहे. या शेतकऱ्यांना वीज कनेक्शनसाठी महिनोन्महिने वाट बघावी लागत आहे. मराठवाड्यात सद्य:स्थितीत पैसे भरलेल्या परंतु कनेक्शन न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या २८ हजारांवर पोहोचली आहे. विभागात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर कृषी पंपांसाठी वीज कनेक्शनची मागणी होत आहे. दरवर्षी हजारो शेतकरी महावितरणकडे त्यासाठीचे शुल्क भरून अर्ज करतात; परंतु कंपनीकडून हे कनेक्शन देण्यासाठी बराच विलंब होतो. त्यामुळे या कनेक्शनसाठी कायम मोठी प्रतीक्षा यादी असते. आताही मराठवाड्यात कनेक्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या २८ हजार ७३० इतकी झाली आहे. या शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवसांपूर्वी कनेक्शनसाठी पैशांचा भरणा केलेला आहे. तसेच हे कनेक्शन मिळावे म्हणून त्यांच्याकडून पाठपुरावाही सुरू आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतात वीज कनेक्शन देण्यासाठी तिथपर्यंत पोल रोवणे, विद्युत तारा जोडणे या बाबी कराव्या लागतात. त्यासाठीचा खर्च मोठा असतो. म्हणून या कामात थोडा उशीर होतो; पण तरीही गत वर्षीपासून ही प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात मराठवाड्यात ३६ हजार शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन दिले गेले आहेत. आता २८ हजार कृषी पंपांना कनेक्शन देणे बाकी आहे. चालू वर्षात प्रलंबित यादीतील २५ हजार शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी वीज कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक तीन महिन्यांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
२८ हजार शेतकरी विजेच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: June 1, 2016 00:13 IST